लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम रेल्वेने ‘शुन्य भंगार’ मोहीम हाती घेतली असून या मोहिमेचा भाग म्हणून रेल्वेच्या हद्दीतील भंगार गोळा करून त्यांची विक्री करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेला २०२४-२५ या वर्षात भंगार विक्रीतून तब्बल ५०७.७८ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.
पश्चिम रेल्वेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर भंगार पडून आहे. त्यात रेल्वे रुळाचे भाग, खांब, धातूचे विविध साहित्य आदींचा समावेश आहे. या भंगारामुळे जागा अडून राहते, अस्वच्छता होते, तसेच पावसाळ्यामध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे पश्चिम रेल्वेने आपल्या हद्दीतील भंगार साहित्य हटविण्याचा निर्णय घेतला आणि ‘शुन्य भंगार’ मोहीम हाती घेतली. या मोहिमेत प्रत्येक विभाग, कारखाना आणि कारशेडमधील भंगाराचे साहित्य गोळा करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेला २०२४-२५ आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून ५०७.७८ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.
शुन्य भंगार मोहिमेत गोळा करण्यात आलेल्या भंगार साहित्यात लोह, स्टील, अॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या वस्तूंची विक्री करण्यात आली. त्याचबरोबर कालबाह्य झालेले रेल्वेचे डबे, वाघिणी, इंजिन, जुने डबे, माल डबे, चाक आदींची विक्री करण्यात आली. या भंगार साहित्याच्या विक्रीतून पश्चिम रेल्वेला २१ मार्च २०२५ पर्यंत ५०७.७८ कोटी रुपये मिळाले असून रेल्वे मंडळाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टापेक्षा ते २७ टक्के जास्त आहे.
विक्रमी भंगाराची विक्री
भंगाराच्या विक्रीतून कोट्यवधी रुपयांची कमाई होते. त्याचबरोबर रेल्वे परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यास मदत होते. पडीत भंगारामुळे अस्वच्छ झालेला परिसर या मोहिमेमुळे स्वच्छ झाला आहे. अडगळीत पडलेल्या साहित्याची विक्री केल्याने, ती जागा मोकळी होते. त्यामुळे त्या जागेचा योग्य तो वापर करता येतो. दरम्यान, पश्चिम रेल्वे भंगार विक्रीचा विक्रम मोडित काढला असून रेल्वे मंडळाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त भंगाराची विक्री केली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.
भंगाराची सामान्यतः सार्वजनिक लिलावाद्वारे किंवा निविदा प्रक्रिया राबवून विक्री करण्यात येते. विविध वर्तमानपत्रांमध्ये भंगार विक्रीची माहिती प्रकाशित केल्यानंतर त्याचा वेकवेगळ्या ठिकाणी लिलाव करण्यात येतो. खरेदीदारांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि स्पर्धा वाढविण्यासाठी लिलाव कार्यक्रम आणि लिलाव कॅटलॉग रेल्वेच्या सार्वजनिक वेबसाइटवर अपलोड करण्यात येतो.