विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात पश्चिम रेल्वे प्रशासनाने विशेष मोहीम उघडली असून अवघ्या एका महिन्यात सुमारे पावणेदोन लाख प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला आहे.
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात ऑक्टोबर महिन्यात रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत उपनगरी गाडय़ांमधून विनातिकीट प्रवास करणारे १,६४,३३७ प्रवासी पकडण्यात आले. त्यांच्याकडून ५ कोटी ८४ लाख ३३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच अवैध किंवा बेकायदा तिकिटावर प्रवास करणाऱ्या ४६९ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ३५,७३८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
संगणकीकृत आरक्षण केंद्रांमध्ये घुसून बनावट नावाने तिकिटे आरक्षित करून नंतर त्यांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांच्या विरोधातही रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. १९८ ठिकाणी रेल्वे प्रशासनाने छापे घातले असून ३६३ व्यक्तींना पकडण्यात आले. त्यातील ३५३ जणांकडून दंड वसूल करण्यात आला तर चौघांना तुरुंगात पाठविण्यात आले आहे.
रेल्वेच्या हद्दीत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या विरोधात वारंवार करावाई करूनही त्यांना रोखणे कठीण असल्याचे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे. भीक मागणाऱ्यांना रेल्वे पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले तरी ही मंडळी पुन्हा पुन्हा रेल्वे गाडय़ांमध्ये आणि फलाटांवर असलेल्या प्रवाशांना त्रास देत असतात. त्यांच्या विरोधातही रेल्वेने खास मोहीम हाती घेतली आहे. एक हजारहून अधिक भिकारी आणि विक्रेते पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर पकडण्यात आले असून त्यांच्यापैकी ६८ जणांना तुरुंगात पाठविण्यात आले आहे. बाकींच्यांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वे मालवाहतुकीत अग्रेसर
पश्चिम रेल्वेने माल वाहतूक करण्यात अन्य रेल्वेच्या विभागांमध्ये आघाडी घेतली असून अवघ्या सात महिन्यांमध्ये सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. गेल्या वर्षी याच काळात पश्चिम रेल्वेने सुमारे पावणे चार हजार कोटी रुपयांची मालवाहतूक केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेने सात महिन्यांमध्येच ४०.५३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा