मुंबईकरांची जीवनवाहिनी ज्यांच्या अहोरात्र कष्टामुळे धडधडत राहते त्या रेल्वेच्या गँगमनना पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा पुरविण्यातही पश्चिम रेल्वेला अपयश आले आहे. गँगमनच्या दादर येथील मुख्य कार्यालयात पुरविले जाणारे पाणी पिण्यालायक नसल्याचा निर्वाळा आता खुद्द मुंबई महापालिकेनेच दिल्याने येथील कामगारांवर पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे.

रेल्वेचे गँगमन दररोज कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतात याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो. परंतु रेल्वेच्या मेहेरबानीमुळे पिण्याच्या पाण्यासाठीही गँगमनना प्रशासनाशी भांडावे लागते आहे. गँगमन दिवसरात्र रेल्वे रुळांवर काम करीत असतात. त्या दरम्यान तहान लागली तर पाणी सोबत हवे म्हणून कामावर निघतानाच कार्यालयातून पाण्याचा कॅन किंवा बाटल्या भरून घेणे हा नेहमीचा शिरस्ता असतो. परंतु गॅंगमनच्या अनेक ठिकाणच्या कार्यालयात पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध नसते. आता तर दादर येथील पश्चिम रेल्वेच्या कार्यालयात गँगमनना पुरविण्यात येणारे पाणी पिण्यालायक नसल्याचा निर्वाळा खुद्द मुंबई महापालिकेच्याच ‘सार्वजनिक आरोग्य विभागा’ने दिला आहे. रेल्वे प्रशासन दाद देत नाही म्हणून इथल्या कामगारांनी स्वत:चे पैसे खर्च करून पालिकेकडून इथल्या पिण्याच्या पाण्याची तपासणी करवून घेतली होती. पाणी पिण्यालायक नसल्याची बाब वरिष्ठांच्याही निदर्शनास आणून देण्यात आली. परंतु तीन महिने झाले तरी त्यावर कार्यवाही झालेली नाही.

दादरमध्ये नव्याने झालेल्या प्लॅटफॉर्मला लागून गँगमनचे मुख्य कार्यालय आहे. दोन वर्षांपूर्वी हे कार्यालय इथे हलविण्यात आले. परंतु तेव्हापासून येथे पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. या ठिकाणी ३०० हून अधिक गँगमनना वावर असतो. त्यांच्यासाठी या कार्यालयाला वॉटर टँकरने पाणीपुरवठा केला जातो. जे काही पाणी रेल्वे कामगारांना पुरविते ते बाटल्या किंवा कॅनमध्ये भरून कामाच्या ठिकाणी पिण्यासाठी वापरले जाते. परंतु काहीच दिवसांत या कामगारांना पोटदुखी, जुलाब, उलटय़ा त्रास सुरू झाला. शंका आल्याने त्यांनी ७ जानेवारीला ५०० रुपये शुल्क भरून हे पाणी पालिकेकडे तपासण्यास दिले. १३ जानेवारीला पाण्याच्या नमुन्यांवर पालिकेने अहवाल दिला. या पाण्यात ‘इ कोलाय’ जीवाणू आढळून आले. त्यामुळे पोटदुखी, ताप, जुलाब यांचा त्रास होऊ शकतो. ‘पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत गरज भागविली जात नसेल तर ते चुकीचे आहे. मात्र या संबंधांत अधिक माहिती घ्यावी लागेल,’ अशी प्रतिक्रिया पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी व्यक्त केली.

सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष्य

केवळ दादरमध्येच नव्हे तर गँगमनच्या बोरिवली, वांद्रे, चर्चगेट अशा सर्वच कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. आता उन्हाळा वाढल्यानंतर तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होईल, अशी प्रतिक्रिया एका गँगमनने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.