मेगा ब्लॉकच्या काळामध्ये प्रवाशांनी गर्दीच्या उपनगरी गाडय़ा पकडू नयेत आणि सुरक्षित प्रवास करण्याचा प्रयत्न करावा, या मध्य रेल्वेच्या आवाहनाला मुंबईकर प्रवाशांनी ‘समजूतदार’पणा दाखवल्यामुळे रविवारी मेगा ब्लॉकच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
रविवारचा दिवस असल्याने सहकुटुंब जाणारे प्रवासी मोठय़ा संख्येने बाहेर पडत असतात. मात्र उपनगरी रेल्वेवर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मेगा ब्लॉकमुळे या प्रवाशांचे हाल होत असतात. तसेच अनेकदा गाडय़ांमधील गर्दीमुळे दुर्घटनाही घडत असतात. या रविवारीही मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर अभियांत्रिकी कामानिमित्त ब्लॉक घेण्यात आले होते. मात्र ठाणे येथे झालेल्या महा मेगा ब्लॉकच्या काळात उपनगरी रेल्वेवर झालेल्या गर्दीमुळे काहीजणांना आपले प्राण गमवावे लागले होते. रेल्वे प्रशासनाने याचा धडा घेऊन प्रवाशांना आवश्यक असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे उपनगरी गाडय़ा कमी असल्या तरी गर्दी असेल तर गाडी पकडू नये असेही आवाहनात म्हटले होते. मेगा ब्लॉकच्या काळात मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर सतत सूचना देण्यात येत होत्या. धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आल्यामुळे नाहूर, कांजुरमार्ग आणि विद्याविहार या स्थानकांवर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाडय़ा थांबत नव्हत्या. याची सूचनाही प्रवाशांना ठराविक अंतराने देण्यात येत होती. त्यामुळेही प्रवाशांना कोणती गाडी पकडावी, याचाही अंदाज घेता येत होता.
सोमवारी संक्रात असून त्याची खरेदी करण्यासाठी मुंबईकर बाहेर पडले पण बहुतेकांनी मेगा ब्लॉकच्या वेळा टाळण्याचा प्रयत्न केला तर काहींनी रेल्वेच्या सूचनेनुसार गर्दीच्या गाडय़ा टाळल्या. मुंबईकर प्रवाशांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रवास करणे टाळले आणि बऱ्यापैकी गर्दी कमी झाली. प्रवाशांचा हा ‘समजूतदार’पणा रेल्वे प्रशासनाच्या पथ्यावरच पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा