स्वच्छ भारत उपकराचा बोजा रेल्वे प्रवाशांवरही 
देश स्वच्छ करण्यासाठी लागू केलेल्या स्वच्छ भारत उपकराचा बोजा थेट रेल्वे प्रवाशांवर पडणार आहे. या उपकरामुळे उपनगरीय प्रवाशांच्या प्रथम दर्जाच्या पासचे दर किमान पाच रुपये तर कमाल ३० रुपये वाढणार आहेत. त्याशिवाय हा उपकर लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वातानुकूलित श्रेणीच्या तिकिटांवरही लागणार असल्याने ‘गारेगार’ प्रवास खिशाला भलताच गरम पडणार आहे. ही दरवाढ १५ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. मात्र, या दरवाढीला उपनगरीय प्रवासी एकता महासंघ, प्रवासी संघटना यांनी विरोध केला आहे. रेल्वे स्वच्छ ठेवण्याचा भार आमच्यावर का, प्रथम दर्जाच्या प्रवाशांसाठी काय सुविधा देणार, असे प्रश्न या संघटनांनी उपस्थित केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेत रेल्वे गेल्या वर्षीपासून अत्यंत सक्रियपणे सहभागी झाली आहे. गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी रेल्वेने प्रत्येक स्थानकात साफसफाई करण्यासाठी प्रवाशांनाही आवाहन केले होते. त्यानंतर या स्वच्छ भारत मोहिमेसाठी रेल्वेत काहीच भरीव कामगिरी झालेली नाही. मात्र, स्वच्छ भारत मोहिमेसाठी निधी गोळा व्हावा या हेतूने केंद्र सरकारने ०.५ टक्के एवढा उपकर लागू करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या व वातानुकूलित श्रेणीच्या तिकिटांनाही लागू आहे.
या निर्णयानुसार उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रथम दर्जाच्या मासिक व त्रमासिक पासात दर शंभर रुपयांमागे ५० पैसे वाढणार आहेत. परिणामी पासमध्ये किमान पाच ते कमाल ३० रुपयाने वाढणार आहे. उपनगरीय रेल्वेच्या प्रथम दर्जाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही विशेष सेवा दिली जात नाही. त्याशिवाय प्रवासी संख्येच्या तुलनेत डब्यांची संख्या व आकारही अत्यंत अपुरा असल्याच्या तक्रारी प्रवासी वारंवार करतात. तरीही रेल्वे दरवाढ करताना प्रथम दर्जाच्या प्रवाशांवर त्याचा बोजा टाकत असते, अशी टीका उपनगरीय प्रवासी एकता महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली आहे. मासिक-त्रमासिक पासाबरोबरच लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वातानुकूलित तसेच प्रथम श्रेणीच्या तिकिटांवरही हा उपकर लागू होणार असल्याने तेथेही किमान पाच रुपये तिकीट दरवाढ होणार आहे. हा निर्णय १५ नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. आलोक बडकुल यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway increase cost of first class monthly ticket of mumbai local trains
Show comments