तिकीट खिडकीवरील रांगांमध्ये जाणारा मुंबईकरांचा वेळ आता वाचणार आहे. मोबाइलद्वारे तिकीट योजनेचा आरंभ केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शनिवारी दादर येथे झाला. या वेळी प्रभू यांनी तक्रार निवारणासाठी पोर्टल, देशभरात ठिकठिकाणी ‘बेस किचन’ अशा अनेक योजना काही काळात सुरू होतील, अशी घोषणा केली. रेल्वेच्या जमिनी विकण्याची कुठलीही भूमिका नसून त्या केवळ भाडेतत्त्वावर दिल्या जातील, असा पुनरुच्चार प्रभू यांनी केला. 

मोबाइलद्वारे तिकीट देण्याच्या योजनेचा आरंभ प्रभू यांच्या हस्ते दादर येथे शनिवारी सायंकाळी झाला. या वेळी आपल्या भाषणात मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या समस्या कमी करण्यावर भर देणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले. देशात रोज २ कोटी ७० लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यात एकटय़ा मुंबईकरांची संख्या ७५ लाखांच्या घरात आहे. मुंबईकरांच्या धावपळीच्या दैनंदिन वेळापत्रकात तिकीट खिडक्यांवरील लांब रांगेचा त्रास कमी व्हावा यासाठी मोबाइल तिकीट योजना सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी अनेक योजना सुरू होणार आहेत. त्यात प्रवाशांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोर्टल आणि लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना ठिकठिकाणी चांगला नाश्ता, जेवण मिळावे यासाठी देशात ५० ते ६० ‘बेस किचन’ उभारण्यात येत आहेत. या ‘बेस किचन’मुळे प्रवाशांना दर दोन ते तीन तासांच्या अंतरावर चांगले जेवण मिळू शकेल. याशिवाय येत्या दोन-तीन महिन्यांत रेल्वेची हेल्पलाइन सेवा सुरू केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबईच्या विकासासाठी नव्या योजना
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेतून हार्बर मार्गाचा विस्तार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली, तर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेलदरम्यानच्या उन्नत रेल्वे मार्गाला ‘पीपीपी’ तत्त्वावर मान्यता मिळाल्याचे ते म्हणाले. ओव्हल मैदान ते विरारदरम्यान उन्नत रेल्वेसाठी राज्य सरकारशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात महापौर स्नेहल आंबेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार राहुल शेवाळे, अनिल देसाई तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक उपस्थित होते.

मोबाइल तिकीट काढणार कसे?
स्मार्ट कार्डद्वारे ज्या पद्धतीने रेल्वे स्थानकातील एटीव्हीएम मशीनद्वारे आपण तिकीट काढतो, त्याच पद्धतीने मोबाइल तिकीट काढावे लागणार आहे. आर वॉलेट हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून ते स्मार्ट कार्डप्रमाणे तिकीट बुकिंग खिडकीत जाऊन रिचार्ज करावे लागणार आहे.
’अ‍ॅण्ड्रॉइड आणि विंडोज फोनमध्ये ‘आर वॉलेट’ अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करावे. (आयफोन आणि ब्लॅकबेरीसाठी लवकरच ते उपलब्ध होईल.)
’अ‍ॅप्लिकेशन उघडल्यानंतर साइन अप करून आपला मोबाइल क्रमांक आणि नाव लिहावे.
’मुंबई शहर निवडून जनरेट ओटीपी (वन टाइम पासवर्ड) हे बटण दाबावे.
’त्वरित आपल्या मोबाइलमध्ये मेसेजद्वारे एक पासवर्ड येईल. तो पासवर्ड अ‍ॅपमध्ये टाकावा.
’ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या स्थानकाला क्लिक करावे. त्यावर संबंधित स्थानकाचे नाव व त्याच्या तिकिटाची रक्कम दर्शवली जाईल.
’‘आर वॉलेट’मधून रक्कम भरणा करावा (आर वॉलेट रेल्वे तिकीट खिडक्यांवरून रिचार्ज करता येते. संकेतस्थळावरूनही ते रिचार्ज करता येऊ शकणार आहे)
’त्यानंतर एसएमएसद्वारे एक युनिक बुकिंग आयडी मिळेल.
’रेल्वे स्थानकातील एटीव्हीएम मशीनमध्ये हा युनिक आयडी क्रमांक नोंदवल्यानंतर त्याची प्रिंट काढून प्रवास सुरू करता येईल.

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी दादर स्थानकातून ‘मोबाइल रेल्वे तिकीट’ योजनेचा शुभारंभ केला. (छाया: गणेश शिर्सेकर)

Story img Loader