मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील सर्वात महत्त्वाच्या घणसोली येथील अतिरिक्त मध्यवर्ती बोगद्यास्थळी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी वैष्णव यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले, बुलेट ट्रेनच्या ३४० किमीचे काम प्रगतीपथावर आहे. भविष्यात बुलेट ट्रेनमुळे नागरिकरण वाढेल, असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घणसोली येथील प्रकल्पस्थळाची पाहणी केल्यानंतर बोलताना वैष्णव म्हणाले की, प्रगत तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून कामे केली जात आहेत. बोगद्यात अत्याधुनिक वायुवीजन आणि प्रकाश व्यवस्थेसह पर्यावरण संरक्षणासाठी उपाययोजनांचा समावेश आहे. तसेच प्रकल्पाच्या ३४० किमीच्या बांधकामात लक्षणीय प्रगती झाली आहे. यासह नद्यांवर पूल बांधणे आणि स्थानकांच्या पायाभूत सुविधांचा विकास यांचा समावेश आहे. वांद्रे-कुर्ला संकुल स्थानकात अभियांत्रिकी चमत्कार म्हणून गौरवले जात आहे. त्याच्या अद्वितीय रचनेमध्ये १० भूमिगत मजले आणि जमिनीच्या वर सात मजले आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, जपानी तज्ञ कामाचे बारकाईने निरीक्षण करून मान्यता देत आहेत. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर बोगद्यातून अप आणि डाऊन मार्गावरून एकाच वेळी बुलेट ट्रेन ताशी २५० किमी वेगाने धावू शकेल. तर, केवळ एकेरी मार्गावर बुलेट ट्रेन जास्तीत जास्त ताशी ३२० किमी धावू शकेल, असे वैष्णव यांनी सांगितले.

हेही वाचा…कल्याणमधील महाराष्ट्रीय कुटुंबावरील हल्ल्याचे प्रकरण : पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रिकरण जतन करा, उच्च न्यायालयाचे खडकपाडा पोलिसांना आदेश

पत्रकारांच्या प्रश्नांवर रेल्वेमंत्र्यांनी घेतला काढता पाय

रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेनच्या घणसोली येथील बोगद्याची माहिती दिली. तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम कसे पूर्ण होणार, प्रकल्पाची अंतिम मुदत काय आहे, असे प्रश्न विचारल्यावर वैष्णव यांनी मौन बाळगले. पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर न देता रेल्वेमंत्र्यांनी तेथून काढता पाय घेतला.

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन ५०८ किमी लांबीचे असून यामध्ये वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाटा दरम्यान २१ किमी लांबीच्या बोगदा उभारण्यात येणार आहे. २१ किमी लांबीच्या बोगद्यापैकी ठाणे खाडीतील ७ किमी लांबीचा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे. यासह सुरुवातीचे वांद्रे -कुर्ला संकुल हे स्थानक भूमिगत स्वरूपात बांधले जाणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाट्यापर्यंत २१ किमी लांबीचा बोगदा खोदण्यासाठी टनेल बोअरिंग यंत्र (टीबीएम) आणि न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. हे काम करण्यासाठी घणसोली येथील ३९४ मीटर लांबीचा अतिरिक्त मध्यवर्ती बोगदा महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. आतापर्यंत १,१११ मीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तर, शीळफाटा येथे एकूण १,६२८ मीटरपैकी ६०२ मीटर बोगद्याचे काम न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग पद्धतीने केले आहे.

वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाट्यापर्यंत २१ किमी लांबीचा बोगदा खोदण्यासाठी टनेल बोअरिंग यंत्र (टीबीएम) आणि न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग पद्धत अशा दोन्ही पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. बोगद्याच्या १६ किमी भागासाठी तीन टनेल बोअरिंग यंत्रांचा वापर केला जाणार असून उर्वरित ५ किमीच्या भागासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. हा बोगदा जमिनीपासून सुमारे २५ ते ६५ मीटर खोल असणार आहे. त्याचा सर्वात खोल भाग शीळफाटाजवळ पारसिक डोंगराच्या खाली ११४ मीटर जमिनीखाली असणार आहे.

हेही वाचा…हल्ल्यातील आरोपी बराच काळ वांद्रे परिसरातच फिरत होता, सीसीटीव्हीद्वारे आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न

घणसोली येथील अतिरिक्त मध्यवर्ती बोगद्याचे काम ६ डिसेंबर २०२३ रोजी सुरू करण्यात आले. सहा महिन्यांच्या आत ३९४ मीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले. यावेळी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली २७ हजार ५१५ किलो स्फोटकांचा वापर करून एकूण २१४ नियंत्रित स्फोट करण्यात आले. तसेच सुरक्षित खोदकामासाठी उच्च दर्जाच्या उपकरणांचा वापर करण्यात आला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway minister ashwini vaishnav visited ghansoli central tunnel site key to mumbai ahmedabad bullet train project mumbai print news sud 02