रेल्वेमंत्र्यांचा करी रोड ते सीएसटीदरम्यान लोकल प्रवास; प्रथमश्रेणी डब्यातील प्रवाशांशी संवाद
मध्य रेल्वेच्या करी रोड स्थानकावर दुपारच्या वेळी अत्यंत तुरळक गर्दी असते. मात्र गुरुवारी दुपारी कल्याणहून सीएसटीकडे जाणारी धिमी गाडी करी रोड स्थानकात १.०५ वाजता शिरली आणि गाडीचे मोटरमन विजय पवार यांना प्लॅटफॉर्मवर नेहमीपेक्षा खूपच जास्त गर्दी दिसली. प्रथम श्रेणीच्या डब्याजवळ गणवेशातील रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी ओळखता येत होते. त्या सगळ्यांच्या गराडय़ात थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रथम श्रेणीच्या डब्यात प्रवेश केला आणि करी रोड ते सीएसटी प्रवास सुरू केला. या प्रवासादरम्यान त्यांनी डब्यातील प्रवाशांशी अगदी मुक्त संवाद साधत छायाचित्रेही काढली.
माटुंगा रेल्वे कार्यशाळेच्या शताब्दी वर्षांच्या सोहळ्यानिमित्त रेल्वेमंत्री सुरेश प्रभू कार्यशाळेत उपस्थित होते. करी रोड येथील पादचारी पुलाचा कोनशिला समारंभही त्यांनी तेथेच उरकला. त्यानंतर मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसह नियोजित भेटीसाठी रेल्वेमंत्री जात असताना वाटेत त्यांनी आपला मोर्चा करी रोड स्थानकाकडे वळवला. येथे नव्या पादचारी पुलाच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले.
हा कार्यक्रम होण्यास दुपारचा एक वाजला. दोन वाजता मुख्यमंत्र्यांसह ठरलेली भेटीची वेळ गाठण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या खात्याच्या उपनगरीय रेल्वेवरच विश्वास ठेवला. दुपारी १.०५ वाजता करी रोड स्थानकात आलेल्या गाडीच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात ते चढले. या डब्यातील ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसह इतर प्रवाशांशीही त्यांनी मोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी प्रवाशांनी मुख्यत्वे प्रसाधनगृहे, वक्तशीर सेवा, रेल्वेची अंतर्गत रचना आदी गोष्टींवर भर दिल्याचे समजते. विशेष म्हणजे ‘भेल’ कंपनीने तयार केलेल्या जुन्या बनावटीच्या गाडीतून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रवास केला. अखेर ही गाडी १.२० वाजता मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचली आणि रेल्वेमंत्री मंत्रालयाकडे रवाना झाले.

३० वर्षांच्या सेवेतील भाग्याचा क्षण
करी रोड स्थानकात एवढी गर्दी बघून भांबावलो होतो. मात्र गाडीत रेल्वेमंत्री चढत आहेत, याची कल्पना नव्हती. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान पाहून कोणी तरी रेल्वे अधिकारी असल्याचे वाटले. गाडी सीएसटीला आली त्यानंतर गाडीतून उतरलेले रेल्वेमंत्री दिसले, त्या वेळी डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आतापर्यंत उत्तम सेवेबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून दिला जाणारा पुरस्कार, १० प्रशस्तिपत्रके मिळाली होती. मात्र मी चालवीत असलेल्या गाडीतून रेल्वेमंत्र्यांनी, रेल्वेचे सर्वोच्च अधिकार असलेल्या व्यक्तीने, प्रवास केला ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ते खूपच गडबडीत असल्याने त्यांना भेटणे अशक्य होते. पण ३० वर्षांच्या सेवेतील हा भाग्याचा क्षण आहे.
– विजय पवार (रेल्वेमंत्र्यांनी प्रवास केलेल्या गाडीचे मोटरमन)