सहा प्रवाशांचा बळी घेणारा मध्य रेल्वेचा ‘महागोंधळ’ आणखी आठवडाभर सुरूच राहणार असल्यामुळे चाकरमान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या गोंधळाचे नियंत्रण करण्यात, त्याची योग्यप्रकारे माहिती देऊन गर्दीला आवर घालण्यात कमी पडल्याची कबुली देणाऱ्या मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी प्रत्यक्षात संवेदनशून्यतेचे दर्शन घडवीत प्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला. किंबहुना थोडी कळ काढली तर अधिक चांगला प्रवास करायला मिळेल, असे ते म्हणाले.
विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मेगा ब्लॉकच्या वेळा पाळल्या गेल्या नसल्याचा दावा करताना लाखो प्रवाशांच्या जिवाशी सुरू असलेल्या खेळाबाबत कोणावरही कारवाई करण्याची तयारी महाव्यवस्थापकांनी दाखविलेली नाही. साधी चौकशी करण्यासही त्यांनी नकार दिला आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील मार्गाचे मजबुतीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या कामातील २० टक्के काम अद्याप पूर्ण व्हायचे बाकी असल्याने आणखी काही दिवस हा गोंधळ सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ब्लॉकचा वेळ वाढल्यावर आम्ही प्रवाशांना पूर्वसूचना देण्यामध्ये कमी पडलो आणि गर्दीचे नियोजन करण्यामध्ये वेगवेगळ्या विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे अपयश आले. रविवारी गर्दी असते. मात्र ती इतकी असेल याचा अंदाज आला नाही, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, नाहूर आणि मुलुंडदरम्यान सायंकाळी ७ वाजता सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
तरुण जखमी
रेल्वेच्या गोंधळामळे बुधवारी आणखी एक रेल्वे प्रवाशी जखमी झाला. नवीन पिलाई असे त्या जखमी तरूणाचे नाव असून तो अंबरनाथचा रहिवाशी आहे. रात्री दहाच्या सुमारास सी.एस.टी. कडून अंबरनाथ कडे जाणाऱ्या लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे ठाणे रेल्वे स्थानकाच्या पाच नंबरच्या फलाटाच्या पुढे हा तरूण पडला.
थोडी कळ सोसा, ३ मिनिटांनी वेळ वाचेल!
मेगा ब्लॉक संपला असला तरी अद्याप अनेक छोटी छोटी कामे पूर्ण करायची आहेत. ठाणे ते कळवा आणि ठाणे ते मुलुंड दरम्यानचे तब्बल ४१ सिग्नल्स बदलण्यात आले असून त्यातील १२ सिग्नल्स हे डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूस लावण्यात आले आहेत. या नव्या स्थलांतराची सवय आणि प्रशिक्षण गाडय़ांच्या मोटरमन, स्थानकप्रमुख आणि सिग्नल्सशी संबंधित कर्मचाऱ्यांना होईपर्यंत गाडय़ांचा वेग कमी होईल, यामुळे पुढील आठवडाभर हा वाहतुकीचा गोंधळ राहणार आहे. मात्र त्यानंतर प्रवासाचा वेळ तीन मिनिटांनी कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळेल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबौध जैन यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा