मुंबई : गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येतात. मात्र २०२१ सालाच्या तुलनेत यंदा गणेशोत्सव काळात कमी विशेष गाड्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. कल्याणवरून कोकणात जाणारी एकही गणपती विशेष रेल्वेगाडी नसल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.
हेही वाचा >>> मुंबईत झिकाचा दुसरा रुग्ण आढळला
गणेशोत्सवाला १३ दिवस बाकी असल्याने कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र बहुतांश रेल्वे प्रवाशांची तिकीटे प्रतीक्षा यादीत असल्याने, प्रवासी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे प्रवासी जादा गणपती विशेष गाड्यांच्या प्रतीक्षेत आहेत. तर, ज्या रेल्वेगाड्या त्यापैकी एकही रेल्वेगाडी ही कल्याणवरून धावत नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. कल्याण, शहाड, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ या पट्ट्यात मोठ्या संख्येने कोकणवासीय राहतात. मात्र तेथून एकही रेल्वेगाडी नसल्याने गैरसोय होत आहे. त्यांना ठाणे, दादर किंवा पनवेल गाठून रेल्वेगाडी पकडावी लागते. परिणामी त्यांना संपूर्ण साहित्य जमा करून लोकल किंवा इतर पर्यायी मार्गाने प्रवास करून इच्छित स्थानक गाठावे लागते.
हेही वाचा >>> दहीहंडी उत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज
यावर्षी मध्य रेल्वेने गणपती विशेष गाड्यांच्या २२६ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यापैकी फक्त २ रेल्वेगाड्यांमध्ये तृतीय श्रेणी वातानुकूलित आणि द्वितीय श्रेणी वातानूकूलित डबे आहेत. तर, काही रेल्वेगाड्या अनारक्षित आणि काही विनावातानुकूलित डबे आहेत. त्यामुळे वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मध्य रेल्वे दरवर्षी पुणे, नागपूर येथून रेल्वेगाड्या सोडते. यापैकी एकच कर्जत – पनवेल मार्गे साप्ताहिक रेल्वेगाडी धावत आहे.नागपूर-मडगाव ही एकच विशेष गाडी असली, ही रेल्वेगाडी मागच्यावर्षीपासून सुरू असल्याने नियमित आहे. याशिवाय या वर्षी एकही गणपती विशेष रेल्वेगाडी कल्याणवरून नाही, असे प्रवासी श्रेयश पटवर्धन यांनी सांगितले.
सध्या नियोजित विशेष रेल्वेगाड्यांच्या व्यतिरिक्त अन्य रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या नाहीत. तसेच कल्याणवरून नागपूर-मडगाव ही एक विशेष रेल्वेगाडी आहे. – डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे