मुंबई : इंडियन रेल्वे कॅटिरग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनचे (आयआरसीटीसी) संकेतस्थळ आणि अॅपच्या सव्र्हरमध्ये सोमवारी रात्री २.५६ पासून मंगळवारी दुपारी १.२८ वाजेपर्यंत तांत्रिक बिघाड झाला होता. तब्बल साडेदहा तास यंत्रणा कोलमडल्याने लाखो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच मुंबई उपनगरीय स्थानकांतील एटीव्हीएम यंत्र, यूटीएस अॅपमधून ऑनलाइन व्यवहार होत नव्हते. परिणामी, प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढता येत नव्हते. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना तिकीट खिडकीकडे धाव घ्यावी लागली. परिणामी, तिकीट खिडक्यांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
तिकीट खिडकीवरील रांगेतून मुक्तता मिळावी, घरबसल्या किंवा कुठूनही तिकीट काढता यावे, यासाठी आयआरसीटीसीचे संकेतस्थळ आणि अॅपचा वापर केला जातो. मात्र सोमवारी रात्रीपासून सव्र्हरच बंद पडला. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेचे तिकीट आरक्षित करताना अडचणींना सामोरे जावे लागले. तिकीट आरक्षण करताना आणि तिकिटांचे पैसे भरताना अडचणी येत होत्या. तसेच यूटीएस अॅप, एटीव्हीएम यंत्र काम करीत नसल्याने उपनगरीय प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रवासी एटीव्हीएम यंत्राकडे जात होते. मात्र त्यावरही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवासी बुचकळय़ात पडले. प्रवाशांची अधिक गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेकरिता तिकीट खिडकीवरून तिकिटे काढण्याचे आवाहन केले. मध्य रेल्वेने १२ पीआरएस तिकीट आरक्षण केंद्रे सुरू केली. सीएसएमटी येथे पाच, कल्याण येथे दोन आणि ठाणे वर्तकनगर, वाशी, मुलुंड, बदलापूर, चेंबूर येथे प्रत्येकी एक तिकीट आरक्षण केंद्र सुरू केले. त्यामुळे प्रवाशांची तिकीट खिडकीवरील गर्दी विभाजित करण्यात काही अंशी यश आले.
मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांतील एटीव्हीएममधून तिकीट काढण्यासाठी आयआरसीटीसीवरून आर्थिक व्यवहार होत नाहीत. त्यामुळे एटीव्हीएम कार्यरत नाही, असे पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांनी समाजमाध्यमावरून सांगितले.
समाजमाध्यमांवर आवाहन
तांत्रिक कारणांमुळे आयआरसीटीसी संकेतस्थळ आणि अॅपवर तिकीट सेवा उपलब्ध नव्हती. रेल्वे सूचना प्रणाली केंद्राचे (क्रिस) तांत्रिक पथक या समस्येचे निराकरण करीत होते. मात्र तांत्रिक अडचण असल्यामुळे थेट दोन खासगी तिकीट आरक्षण अॅपवरून तिकीट काढण्याचे आवाहन आयआरसीटीसीने समाजमाध्यमांवर केले.