कुर्ला रेल्वे स्थानकातून पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला रेल्वे स्थानकात रात्रीची शेवटी लोकल चुकल्याने पाच वर्षांच्या मुलासह त्याची आई स्थानकातच थांबली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे मुलाचे अपहरण झाल्याचे तिच्या लक्षात आले. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी तपास करून आरोपी रेहाना शेख (२४) हिला सोमवारी अटक केली. तसेच, पाच वर्षांच्या मुलाला आईच्या स्वाधीन केले. कुर्ला पश्चिमेकडील एका उपहारगृहात काम करणाऱ्या तक्रारदार महिला शबनम तायडे हिला रविवारी रात्री कामावरून कुर्ला स्थानकात येण्यास विलंब झाला.
हेही वाचा >>>मुंबई : मलिक खरोखर गंभीर आजाराने त्रस्त ? जामीन नाकारताना विशेष न्यायालयाचा प्रश्न
कुर्ला स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांना रात्रीची शेवटची लोकल मिळाली नाही. त्यामुळे ती मुलासह कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वरील आरक्षण विभागात झोपली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता तिला जाग आली. त्यावेळी जवळ मुलगा नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने कुर्ला स्थानक व इतरत्र मुलाचा शोध घेतला, मात्र, तिला मुलगा सापडला नाही. याप्रकरणी तिने कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कुर्ला स्थानक आणि परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी केली.
तांत्रिक शाखेकडून व खबऱ्यांकडून माहिती मिळवून मुलाचा शोध घेण्यात आला. यावेळी कुर्ला पश्चिम परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात एक अज्ञात महिला मुलाला घेऊन जात असल्याचे दिसले. ती महिला गोरेगाव पूर्व भागात राहत असल्याचे समजताच पोलिसांनी आरोपी रेहाना शेखला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली असता, तिने मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करून तिला सोमवारी अटक केली. तसेच या मुलाला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.