कुलदीप घायवट, लोकसत्ता
मुंबई : दूरध्वनीवरून मुंबईमध्ये दंगल, बॉम्बस्फोट घडविण्याबाबत धमकी देण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा वेळी संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क होत असून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची तपासाणी करण्यात येते. तसेच दहशतवादी संघटनांकडून मुंबईतील वर्दळीची रेल्वे स्थानके लक्ष्य केली जातात. यावेळी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा जवानांसह श्वान पथकालाही पाचारण करण्यात येते. तसेच गुन्ह्यांचा छडा, अमलीपदार्थांची तस्करी रोखण्यासाठी रेल्वे पोलीस दलात श्वानांची भरती करण्यात आली आहे. ‘ऑक्सर’, ‘जॅक’, ‘मॅक्स’, ‘डिझेल’ हे चार श्वान प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबर महिन्यात या पथकात दाखल होणार आहेत.
हेही वाचा >>> विरार – बोळींजमधील शेवटचे घर विकले जाईपर्यंत अर्ज विक्री – स्वीकृती; म्हाडाच्या कोकण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
करोनापूर्वकाळाप्रमाणे रेल्वे स्थानकांत गर्दी होऊ लागली आहे. लांबपल्ल्यांच्या गाड्यांमधील प्रवासी, तसेच उपनगरीय लोकल प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे पोलीस, आरपीएफ व इतर सुरक्षा विभागाच्या खांद्यावर आहे. या सुरक्षा व्यवस्थेला आणखी बळकटी येण्यासाठी श्वान पथक कार्यरत आहे. रेल्वे स्थानकात बॉम्ब आणि स्फोटके यांचा शोध घेण्यासाठी चार बॉम्बशोधक श्वान कार्यरत आहेत. तर ‘ऑक्सर’, ‘जॅक’, ‘मॅक्स’, ‘डिझेल’ हे चौघे श्वान पथकात दाखल होणार आहेत. गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी ‘मायकल’ गुन्हेशोधक श्वान आणि मुंबईत अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी ‘रॉकी’ श्वान प्रशिक्षण घेत आहे, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे पोलिसाने दिली.
रेल्वे पोलिसांच्या श्वान पथकात एकूण दहा श्वान तैनात होणार
येत्या दोन महिन्यांत रेल्वे पोलिसांच्या श्वान पथकात आठ बॉम्बशोधक, एक अमलीपदार्थ शोधक आणि एक गुन्हेशोधक श्वान दाखल होणार आहेत. सध्या ‘ऑक्सर’, ‘जॅक’, ‘मॅक्स’, ‘डिझेल’ या लॅब्राडोर जातीच्या श्वानांना पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) बॉम्बशोधण्याचे, ‘रॉकी’ नावाचा जर्मन शेफर्ड जातीचा श्वान अमलीपदार्थ शोधण्याचे प्रशिक्षण घेत आहे. त्यांचे प्रशिक्षण सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. एका आठवड्यापूर्वी ‘मायकल’ नावाचा डॉबरमन जातीचा श्वान घेण्यात आला आहे. ‘मायकल’ साधारण दोन महिन्यांचा असून त्याला पुणे येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. ‘मायकल’ गुन्हेशोधकाचे काम करणार आहे.
सध्या कार्यरत असलेले श्वान रेल्वे पोलिसांच्या घाटकोपर येथील मुख्यालयात बॉम्बशोधक चार श्वान कार्यरत आहेत. यामध्ये ‘रुद्र’, ‘हिरा’ या लॅब्राडोर जातीच्या, तसेच ‘किरा’, ‘साशा’ या बेल्जियन श्वानांचा समावेश आहे. ‘हिरा’ ९ वर्षांचा, ‘रुद्र’ साडेपाच वर्षांच्या, ‘किरा’ आणि ‘साशा’ साडेतीन वर्षाचे आहेत.