कुलदीप घायवट
मुंबई: मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलीस प्रवाशांची लूट होत असल्याचा तक्रारी वाढत असून परिणामी रेल्वे पोलिसांवर आता लोहमार्ग अतिरिक्त पोलीस महासंचालक लक्ष्य ठेवणार असून अचानकपणे तपासणी करून सर्व प्रकाराचा छडा लावण्यात येणार आहे. त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या, अवैध वस्तू बाळगणाऱ्या प्रवाशांना कायद्याचा धाक दाखवून पैसे उकळणाऱ्या रेल्वे पोलिसांवर टांगती तलवार असणार आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील अनेक पोलीस वर्दी न घालताच नियमांचे उल्लंघन करून सामानाची तपासणी करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. नुकतेच कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील दोन रेल्वे पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी केली. यापूर्वी, एका प्रवाशाचे विदेशी चलन लाटण्याचा प्रकार घडला होता. तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्याच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना तसेच मौल्यवान दागिने घेऊन जाणाऱ्या सोने व्यापाऱ्यांना कायद्याची भीती दाखवून लुटण्याचे प्रकार घडला आहे. याप्रकरणी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईही झाली आहे. मात्र, अद्यापही प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीचा भंग करण्यात येत आहे. अशी प्रकरणे रोखण्यासाठी रेल्वे स्थानकात अचानक धाड टाकून, नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या पोलिसांना पकडण्यात येणार आहे. तसेच, त्यात दोषी आढळणाऱ्या रेल्वे पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक रेल्वे पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे वागणे आवश्यक आहे. जेथे नियमबाह्य कृत्य होत असेल्याच्या तक्रारी आहेत, तेथे अचानक तपासणी करण्यात येणार आहे, असे लोहमार्ग अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> तोतया पोलिसांकडून २५ लाखांची फसवणूक; आरोपींना मदत करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक
नियम काय आहेत ?
मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानक आणि परिसरातील संशयास्पद रेल्वे प्रवाशांचे साहित्य, समान यांची तपासणी करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
- रेल्वे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गणवेश घातलेला असावा.
- ‘बॅग चेकिंग ड्युटी’ असे ठळक लिहिलेले ओळखपत्र गळ्यात असावे.
- सीसीटीव्हीच्या निगराणीखाली प्रवाशांच्या सामानाची तपासणी करावी. प्रवाशांच्या सामानाची तपासणी कर्तव्यावरील पोलीस अधिकाऱ्याच्या समक्ष करावी.
- प्रवाशांकडे बेकायदेशीर वस्तू आढळल्यास, त्यासंदर्भातील सर्व माहिती पोलीस अधिकाऱ्यांना कळवून, स्वतंत्र प्रमाणित केलेल्या नोंदवहीत लिहावी.