मध्य रेल्वेच्या २० लोकल फेऱ्यांत प्रयोग
सुशांत मोरे, मुंबई</strong>
अपंगांच्या डब्यात घुसखोरी करून त्यांना मनस्ताप देणाऱ्या प्रवाशांना रोखण्याकरिता अपंगांच्या डब्यात गर्दीच्या वेळी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर मध्य रेल्वेच्या २० लोकल फेऱ्यांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली.
मुंबईतील उपनगरी रेल्वे गाडय़ांमध्ये अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यातून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे. मात्र, या डब्यांत नेहमीच घुसखोरी केली जाते. गेल्या दोन वर्षांत पश्चिम रेल्वेवर ३४ हजार ३३८ आणि मध्य रेल्वेवर ३१ हजार घुसखोर प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतरही प्रवाशांवर वचक बसलेला नाही. त्यामुळे आता मध्य रेल्वेने अपंगांच्या डब्यासह त्याला लागून असलेल्या महिला डब्याची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मार्गावरील लोकल फेऱ्यांचा आढावा घेतला असता गर्दीच्या वेळेतील ८७ लोकल फेऱ्यांत सर्वाधिक घुसखोरी होत असल्याचे आढळून आले. या फेऱ्यांच्या अपंगांच्या डब्यात रेल्वे सुरक्षा दलाचा जवान तैनात करून सामान्य प्रवाशांना त्या डब्यात प्रवेश करण्यास मनाई करेल आणि तसे केल्यास कारवाईचा बडगाही उचलेल. परंतु एवढय़ा मोठय़ा प्रमाणात असलेल्या फेऱ्यांमध्ये रेल्वे पोलीस तैनात करणे सध्या तरी शक्य नसल्याने अखेर कल्याणच्या, पनवेलच्या दिशेने धावणाऱ्या आणि सीएसएमटीकडे येणाऱ्या २० लोकल फेऱ्यांमध्येच तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, खोपोली, पनवेल यासह अन्य लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. अपंग डब्याला जोडूनच महिलांचे डबेही आहेत. त्यामुळे अपंगांच्या डब्यात राहूनही रेल्वे पोलीस महिला डब्यातील सुरक्षेवरही लक्ष ठेवू शकणार आहेत.
मध्य रेल्वेवर २०० होमगार्ड
सध्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तसेच लोहमार्ग पोलीसही स्थानक व लोकल गाडय़ांमध्ये तैनात असतात. आता २०० होमगार्डही लवकरच मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. होमगार्डची मदत गर्दीवर नियंत्रणासाठी घ्यावी की अन्य सेवेसाठी त्याचा विचार केला जात आहे.
अपंगांच्या डब्याचा रंग बदलणार
मध्य रेल्वेने अपंगांचा डबा ओळखता यावा यासाठी त्या डब्याचा बाहेरील बाजूने पिवळा रंग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या दहा लोकल गाडय़ांमधील अपंग डब्यांना रंग देण्यात आला असून सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व अपंग डब्यांना रंग देण्याचे उद्दिष्ट आहे.
अपंग प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या डब्यातील घुसखोरी रोखण्यासाठी त्या डब्यात रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्याची योजना आहे. त्यासाठी गर्दीच्या वेळेतील २० लोकल फेऱ्या निवडण्यात येतील. ही योजना यशस्वी झाली की त्याचा विस्तार कसा करता येईल याचा विचार केला जाईल.
के.के.अश्रफ (मध्य रेल्वे-वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त)