प्रवासी संघटनांची आक्रमक भूमिका; लांब पल्ल्याच्या गाडय़ांमुळे उपनगरीय सेवेला फटका
रेल्वेने मुंबईतून कोणतीही लांब पल्ल्याची नवीन गाडी सुरू करण्याआधी मध्य रेल्वेवरील पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प पूर्ण करावा, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. ठाणे-दिवा आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला यांदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका पूर्ण होत नाही, तोपर्यंत रेल्वेने मुंबईसाठी एकही नवीन गाडी सोडू नये. लांब पल्ल्याच्या गाडय़ा उपनगरीय क्षेत्रात आल्यावर उपनगरीय लोकल सेवेला त्याचा फटका बसतो. त्यामुळे मध्य रेल्वेच्या ४०-४२ लाख प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने ही मागणी केली जात आहे.
गेल्या वर्षी रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एकाही नव्या लांब पल्ल्याच्या गाडीची घोषणा केली नव्हती. मात्र गेल्या वर्षभरात मुंबईतून तीन ते चार नव्या गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश गाडय़ा लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुरू झाल्या आहेत. या गाडय़ा ठाण्यापर्यंत पाचव्या-सहाव्या माíगकेवरून जात असल्या, तरी ठाणे ते कल्याण यादरम्यान त्या तिसऱ्या-चौथ्या मार्गावरूनच जातात. परिणामी उपनगरीय लोकलला त्याचा फटका बसतो, असे ठाणे रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.
उपनगरीय रेल्वेच्या मार्गात लांब पल्ल्याची एक गाडी आली की, त्यामुळे तीन जलद गाडय़ांचा मार्ग रोखला जातो, असे रेल्वेचे अधिकारीच वारंवार स्पष्ट करत दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी दिव्यावरूनच मागे वळवतात. मग हेच सूत्र कोणतीही नवीन गाडी सोडताना रेल्वे का पाळत नाही, असा प्रश्न उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी उपस्थित केला. लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी नवीन माíगका तयार झाल्या की, रेल्वेने मुंबईकडे येणाऱ्या वा मुंबईबाहेर जाणाऱ्या गाडय़ांची संख्या वाढवण्यास काहीच हरकत नाही. पण सद्य:स्थितीत रेल्वेने एकही गाडी नव्याने सोडू नये, असे मत त्यांनी मांडले.
उपनगरीय रेल्वे प्रवाशांची एकूण संख्या लक्षात घेतल्यास भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येपकी ३० ते ४० टक्के प्रवासी दर दिवशी मुंबईत प्रवास करतात. उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक पाच किंवा दहा मिनिटांनी विस्कळीत झाले, तरी त्याचा फटका लाखो लोकांना बसतो. तसेच गाडय़ांना प्रचंड गर्दी होते. रेल्वेला नव्या लोकल सेवा चालू करणे शक्य होत नसेल, तर त्यांनी लांब पल्ल्याच्या गाडय़ाही सोडू नयेत, असे मत प्रवासी संघटनेच्या महिला सदस्या लता अरगडे यांनी मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा