मुंबई : मुंबई महानगरात राहणाऱ्या कोकणवासियांना आता गणेशोत्सवाची चाहूल लागली असून गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण शनिवारपासून (४ मे) सुरू होणार आहे.
कोकणवासियांसाठी होळी आणि गणेशोत्सव हे अत्यंत जिव्हाळ्याचे सण आहेत. त्या कालावधीत मुंबईस्थित कोकणवासीय मूळ गावी धाव घेतात. वेगवेगळ्या मार्गाने गावी पोहचण्यासाठी धडपड सुरू असते. यंदाच्यावर्षी ७ सप्टेंबरला गणेशचतुर्थी आहे. त्यामुळे आता अनेक कोकणवासीयांचे गावी जाण्याचे नियोजन सुरू झाले आहे. भारतीय रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवसाआधी सुरु होते. त्यामुळे १ सप्टेंबर रोजी धावणाऱ्या कोकणातील रेल्वेगाडीचे तिकीट ४ मेपासून काढता येणार आहे. गेल्यावर्षी तिकीट आरक्षण सुरू झाल्यानंतर अवघ्या दीड मिनिटांत प्रतीक्षा यादी हजारांपेक्षा अधिक होती. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या गाड्यांची तिकिटे काढताना, प्रतीक्षा यादीचीही क्षमता संपली होती.
हेही वाचा – मुंबई : परिचारिकेला मारहाण केल्याच्या निषेधार्थ भाभा रुग्णालयात आंदोलन
मुंबईतून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मार्गावर जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण ७ मे रोजीपासून सुरू होणार आहे. ६ सप्टेंबर रोजी हरतालिका आहे. त्या दिवशीचे तिकीट आरक्षण ९ मेपासून सुरू होईल. गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर रोजी, ऋषिपंचमी ८ सप्टेंबर रोजी, गौरी विसर्जन १२ सप्टेंबर रोजी आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशीचे रेल्वेगाड्यांचे तिकीट अनुक्रमे १० मे, ११ मे, १५ मे आणि २० मे रोजी काढता येणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहून आरक्षण करावे. तिकीट आरक्षण रेल्वे स्थानक किंवा आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून किंवा अॅपवरून करू शकतात, असे आवाहन कोकण विकास समिती यांच्याकडून केले आहे.