आरक्षित तिकिटाच्या तारखेत बदल करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला असून त्याची अमलबजावणी देशभरात तातडीने करण्यात आली आहे. या नव्या बदलानुसार तिकीट रद्द न करता आरक्षित तिकिटाची तारीख पुढे ढकलण्यासाठी आरक्षणाच्या सुरुवातीच्या एका तासात र्निबध घालण्यात आले आहेत.  या बदलासाठी आलेल्या तिकिटांचा विचार एका तासानंतरच करण्यात येणार आहे.  
 रेल्वेचे ६० किंवा १२० दिवसांनंतरचे तिकीट आरक्षित केल्यावर त्या तिकिटावरील तारीख तिकीट रद्द न करताही बदलता येते, हा नियम सामान्य प्रवाशांना माहीत नसला, तरी दलाल याचा फायदा घेतात. आरक्षित तिकिटाच्या तारखेपुढील एखाद्या तारखेची आरक्षणे सुरू होण्याच्या दिवशी सकाळी हे तिकीट घेऊन तिकीट खिडकीवर दलाल जातात. आरक्षण सुरू झाल्या झाल्या आपल्याकडील वेगळ्या तारखेचे तिकीट खिडकीवर सरकवून त्यात फक्त तारखेचा बदल करून नव्या तारखेचे कन्फर्म तिकीट मिळवतात. तिकीट काढताना प्रवाशाची पूर्ण माहिती त्यात न देता फक्त तारखेत बदल करायचा असल्याने तिकीट प्रक्रिया लवकर पूर्ण होत होती. त्यामुळे या दलालांना आरक्षित तिकिटे मिळणे सोपे झाले होते. आता रेल्वे बोर्डाने  नियमात बदल करत अशा तिकिटात फेरबदल करणाऱ्या प्रवाशांना आरक्षण सुरू झाल्यानंतरचा पहिला तासभर र्निबध घालण्यात आला आहे.