उन्हाळ्याची सुटी लागताच मुंबईबाहेर गावी अथवा अन्यत्र पर्यटनासाठी जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागली असून, प्रवासाच्या सर्वच साधनांची कमतरता पडू लागली आहे. रेल्वे, एसटी आणि खासगी वाहनेही फुल्ल झाली असून अद्याप बाहेर जाणाऱ्यांची प्रतीक्षा यादी कमी झालेली नाही.
वेगवेगळ्या कंपन्यांच्या खासगी बसेसमध्येही जागा मिळणे कठीण झाले आहे. बिगर वातानुकूलित गाडय़ांपेक्षा व्होल्वो बसेसना जास्त मागणी आहे.
दादरच्या प्रीतम टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचे कैलास खारगे यांनी सांगितले की, एप्रिल महिना सुरू झाल्यापासून दररोज २०० खासगी बसेस केवळ कोकणातील वेगवेगळ्या गावी जात आहेत. कणकवली, मालवण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या व्यतिरिक्त बंगळुरू, मंगलोर, बेळगाव आणि हुबळी तसेच गोवा-कोल्हापूरसाठीही मागणी आहे. जवळपास १५०० रुपये खर्चून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
‘पूर्वी एप्रिलमध्ये गेलेली कुटुंबे एकदम जून महिना उजाडला की परत येत असत. आता परिस्थिती बदलली आहे,’ असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सिद्धेश्वर तेलुगू यांनी सांगितले. गेल्या वर्षी कोकण रेल्वेने १९० विशेष फेऱ्या चालविल्या होत्या. यंदा आतापर्यंत १८० पेक्षा जास्त फेऱ्या सुरू झाल्या असून आणखी काही फेऱ्या सुरू होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. रेल्वेचे आरक्षण दुरापास्त झाल्यानंतरच मुंबईकर एसटी किंवा खासगी बसेसकडे वळत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खासगी गाडय़ांचे शुल्क एसटीपेक्षा कमी असल्याने आणि या गाडय़ा प्रवाशांच्या घराजवळ असल्याने लोकांचा ओढा खासगी बसेसकडे जास्त असतो, हा दावा एसटी महामंडळाच्या साहाय्यक जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी फेटाळून लावला. एसटीच्या नियमित गाडय़ांव्यतिरिक्त विशेष गाडय़ाही प्रवाशांनी भरून जात असल्याचे सांगितले.
मुंबईबाहेर पळण्याची घाई रेल्वे, एसटी, खासगी वाहने ‘फुल्ल’
उन्हाळ्याची सुटी लागताच मुंबईबाहेर गावी अथवा अन्यत्र पर्यटनासाठी जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागली असून, प्रवासाच्या सर्वच साधनांची कमतरता पडू लागली आहे. रेल्वे, एसटी आणि खासगी वाहनेही फुल्ल झाली असून अद्याप बाहेर जाणाऱ्यांची प्रतीक्षा यादी कमी झालेली नाही.
First published on: 28-04-2013 at 02:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway s t private vehicle full due to hurry to go out of mumbai