रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचे ‘छपरी’ प्रवाशांना साकडे
रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वे सुरक्षा दलाचा जवान हातात काठी घेऊन वर बघत कोणाची तरी विनवणी करतोय, हे दृश्य पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका! गाडीच्या टपावरून प्रवास करणाऱ्या ‘छपरी’ प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यासाठी सध्या या कायदा मोडणाऱ्या प्रवाशांच्या हातापाया पडण्याची वेळ रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांवर आली आहे. त्यामुळे या छपरी प्रवाशांविरोधातील मोहिमेलाही मर्यादा येत आहेत.
गाडीच्या टपावरून प्रवास करणाऱ्या मध्य रेल्वेवरील ‘छपरी’ प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल विशेष मोहीम राबवत असताना दुसऱ्या बाजूला याच ‘छपरी’ प्रवाशांच्या पाया पडण्याची वेळ सुरक्षा दलावर येत आहे. या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी आधी त्यांना ताब्यात घेणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांना टपावरून खाली उतरवण्याचे काम महत्त्वाचे आहे. मात्र हे काम जोखमीचे असल्याने छोटी चूकही प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते आणि अनिष्ट प्रसंग उद्भवू शकतो. हे टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रवाशांची मनधरणी करत असल्याचे दृश्य दिसते.
हार्बर मार्गावर अद्यापही डीसी-एसी परिवर्तन झाले नसल्याने येथे प्रवासी गाडीच्या टपावरून प्रवास करतात. दोन आठवडय़ांपूर्वी अशाच एका प्रवाशाचा धक्का ओव्हरहेड वायर यंत्रणेला लागून हार्बर मार्गाची सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने विशेष मोहीम राबवत केवळ आठवडाभरातच ९९ प्रवाशांवर कारवाई केली होती. ही कारवाई यापुढेही चालूच ठेवण्याचा रेल्वे सुरक्षा दलाचा निर्धार असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी स्पष्ट केले.
या कारवाईदरम्यान आणखी मोठय़ा संख्येत प्रवाशांना दंड ठोठावणे किंवा पकडणे सहज शक्य होते. मात्र, ही कारवाई करताना छपरी प्रवाशांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागत असल्याची कबुलीही भालोदे यांनी दिली. टपावरून प्रवास करणारे प्रवासी ओव्हरहेड वायरच्या खूप जवळ असतात. त्यांच्यावर कारवाई करताना अनेकदा ते पळ काढण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांना खाली उतरवताना आमच्या जवानांना अक्षरश: ‘बाबापुता’ करून त्यांची मनधरणी करावी लागते. गाडी प्लॅटफॉर्मवर काही मिनिटांसाठीच थांबत असल्याने जवानांकडे फारसा वेळही नसतो. काही प्रवासी खाली येतात आणि त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होते. मात्र काही प्रवासी खाली न उतरल्याने किंवा दुसऱ्याच बाजूला उतरल्याने त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होत नाही, असे भालोदे यांनी सांगितले.
या प्रवाशांना खाली उतरवण्यासाठी बलाचा वापर केला आणि त्या दरम्यान काही अप्रसंग ओढवला, तर ती जबाबदारी थेट रेल्वे सुरक्षा दलावर येईल. त्यातून या घटनांना विविध कंगोरे फुटतील. हे टाळण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान डब्यावर काठी आपटणे आणि प्रवाशाची विनवणी करणे, यापलीकडे काहीच करू शकत नसल्याची खंत भालोदे यांनी व्यक्त केली. प्रवाशांनीच आपल्या जिवाचे मोल जाणून हे असले धोकादायक प्रकार टाळण्याची गरज आहे. प्रवासी सुरक्षेच्या इतर मुद्दय़ांऐवजी अशा मुद्दय़ांशी लढण्यात सुरक्षा दलाची शक्ती पणाला लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘कृपया, खाली उतरता का..’
‘छपरी’ प्रवाशांच्या पाया पडण्याची वेळ सुरक्षा दलावर येत आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 17-11-2015 at 09:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway security force soldiers request to spolied passengers