मुंबई : माथेरान-नेरळ मिनी ट्रेन मार्गावर घाटात एक रेल्वे स्लीपर्सचा तुकडा अज्ञात व्यक्तींकडून ठेवण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मिनी ट्रेनचा लोको पायलट दिनेश चंद मीणा आणि सहायक लोको पायलट सुधांशु पी यांनी प्रसंगावधान दाखवून त्वरित ही गाडी थांबवली आणि स्लीपर्सचा तुकडा बाजूला केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सध्या शाळांना सुटय़ा सुरू असून माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी आहे. त्यातच मिनी ट्रेनलाही चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे घडलेल्या घटनेची दखल घेऊन मध्य रेल्वेकडून चौकशी करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन २२ ऑक्टोबरपासून पर्यटकांच्या सेवेत पुन्हा दाखल झाली. दिवसभरात अप व डाऊन अशा चार फेऱ्या होतात. नेरळ ते माथेरानबरोबरच अमन लॉज ते माथेरान अशा शटल सेवाही चालवण्यात येतात. सध्या प्रत्येकी सहा डब्यांच्या तीन मिनी ट्रेन असून त्या डिझेल इंजिनावर धावतात. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता माथेरान-नेरळ अशी मिनी ट्रेन घाटातून जात असतानाच या मार्गावर रेल्वेचा एक तुकडा ठेवण्यात आला होता. हा तुकडा म्हणजे रुळांखाली वापरण्यात येणारा लोखंडी स्लीपर्स होता. हा तुकडा पाहताच मिनी ट्रेनचे लोको पायलट दिनेश आणि सहायक लोको पायलट सुधांशु यांनी प्रसंगावधान दाखवून मिनी ट्रेन थांबवली.

हा तुकडा त्वरित बाजूला केला आणि या घटनेची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाला दिला. त्यानंतर गाडी पुढे रवाना करण्यात आली. या घटनेची चौकशी केली जात असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. दरम्यान, नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पर्यटकांसाठी पुन्हा सुरू झाल्यानंतर तीन हजार ६९८ प्रवाशांनी यातून प्रवास केला आहे.