* फलाटांची उंची वाढवण्याऐवजी रेल्वेची प्रवाशांसाठी उद्घोषणा
* उपनगरीय रेल्वेमार्गावरील २७३ पैकी फक्त २४ फलाटांची उंची वाढली
* वर्षभरात ‘जीवघेण्या पोकळी’चे २७ बळी
मध्य रेल्वेवरील उपनगरीय गाडी सध्या दर दिवशी प्रत्येक स्थानकात शिरण्याआधी मंजूळ स्वरात एक उद्घोषणा प्रवाशांच्या कानी पडत आहे, ‘गाडीतून उतरण्यापूर्वी गाडीचे पायदान आणि प्लॅटफॉर्म यांमधील अंतर सांभाळा!’ फलाट आणि गाडी यांच्यातील जीवघेणी पोकळी कमी करण्याऐवजी मध्य रेल्वे प्रशासन प्रवाशांनाच काळजी घेण्याची सूचना करत असल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे मोनिका मोरे प्रकरणानंतर उच्च न्यायालयाने आदेश देऊनही आतापर्यंत उपनगरीय रेल्वेमार्गावरील २७३ पैकी फक्त २४ फलाटांची उंची वाढवण्यात आली असून उर्वरित फलाटांची उंची अद्यापही धोकादायक अवस्थेतच आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासन ही उंची वाढवण्याचे काम हाती घेणार की फक्त प्रवाशांना मंजूळ स्वरात सूचना ऐकवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रेल्वे फलाट आणि गाडी यांच्यातील जीवघेण्या पोकळीमध्ये पडून यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत मध्य रेल्वेवर १० आणि पश्चिम रेल्वेवर १७, असे २७ जण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच या पोकळीत अडकून १८ जण गंभीर जखमीही झाल्याची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे झाली आहे. या अपघातांच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने फलाटांची उंची वाढवण्याचे काम जलद गतीने पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र रात्रीच्या वेळी दोन-तीन तासांचा अवधीच या कामासाठी मिळत असल्याने हे काम म्हणावे त्या गतीने होत नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
आतापर्यंत फक्त २४ फलाटांची उंची वाढली
मोनिका मोरे प्रकरणानंतर उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला मे २०१५पर्यंत २४ अतिधोकादायक फलाटांची उंची ८४० मिमीवरून ९०० मिमी एवढी वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मध्य व पश्चिम रेल्वेने २४ फलाटांचे काम पूर्ण केले आहे. मात्र मध्य व पश्चिम रेल्वेच्या हद्दीत एकूण ७६ स्थानकांमधील २७३ फलाटांचा समावेश आहे. आता २४ फलाट वगळता उर्वरित फलाटांची उंची कधी वाढणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. ही उंची वाढवण्यासाठी मार्च २०१८ उजाडेल, असे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे पुढील तीन वर्षे प्रवाशांना ‘गाडीचे पायदान आणि फलाट यांमधील अंतर’ स्वत:चे स्वत:च सांभाळावे लागणार आहे.