मुंबई : होळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी नियमित रेल्वेगाड्यांसह, विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. परंतु, प्रवाशांना स्थानकापर्यंत सोडण्यासाठी येणारे कुटुंबीय, नातेवाईक यांची रेल्वे स्थानकात गर्दी होते. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे सुरक्षा व्यवस्थेला कठीण जाते. हा प्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासह भुसावळ, नागपूर, पुणे विभागांतील रेल्वे स्थानकावर १६ मार्चपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

होळीनिमित्त मुंबईतून विशेषतः कोकणात, उत्तर भारतात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून विशेष रेल्वेगाड्यांची धाव सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नियमित रेल्वे प्रवाशांसह बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ रेल्वे स्थानकात वाढणार आहे. गर्दीचा लोंढा वाढून प्रवाशांची धक्काबुक्की होण्याचा, चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका उद्भवतो. अशा घटना टाळण्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गर्दी होणाऱ्या ठिकाणी लक्ष ठेवणे, प्रवाशांना एकाच ठिकाणी थांबून न राहण्याचे आवाहन करणे असे उपाय अवलंबले जात आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्थानकात येणारी अतिरिक्त गर्दी रोखण्यासाठी, प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने प्रमुख स्थानकावर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध आणले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), ठाणे, कल्याण, पनवेल, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, नागपूर, पुणे अशा ११ स्थानकांवर फलाट तिकीट मिळणार नाही, असे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले यांचा प्रवास सोयीचा होण्यासाठी त्यांच्यासह असणाऱ्या व्यक्तीला फलाट तिकीट दिले जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.

पश्चिम रेल्वेवरील फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आलेली नाही. परंतु, होळी निमित्त रेल्वे टर्मिनसवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षकांचा फौजफाटा तैनात केली आहे. प्रवाशांची ये-जा रांगेत होण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. तसेच ज्या प्रवाशांकडे आरक्षित तिकीट आहे, त्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल. ज्या प्रवाशांकडे सामान्य रेल्वेतिकीट असेल त्यांना रेल्वेगाडी सुटण्याच्या दोन तास आधी रेल्वे स्थानकात प्रवेश मिळेल. रेल्वेगाडी सुटण्यापूर्वी आलेल्या प्रवाशांना विश्रांती कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पश्चिम रेल्वे तयारीत आहे.- विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Story img Loader