|| प्रसाद रावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेकडून धोरणाची अंमलबजावणी पुन्हा सुरू

मुंबई : करोना प्रतिबंधात्मक निर्बंध शिथिल होताच पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांलगतच्या परिसरात पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी गर्दी केली आहे. स्थानक परिसरात प्रवासी आणि वाहनांची संख्या वाढत असून हा परिसर गर्दीत घुसमटू लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा रेल्वेलगतचा १५० मीटर परिसर फेरीवालामुक्त करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

 गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील स्थानक परिसर फेरीवाल्यांच्या गराडय़ात अडकला होता. रेल्वे स्थानकात जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना या परिसरातून चालणेही अवघड झाले होते. तसेच वर्दळीतच धावणाऱ्या वाहनांमुळे प्रवासी आणि पादचाऱ्यांचे छोटे-मोठे अपघातही होत होते. या बाबी लक्षात घेऊन पालिकेने रेल्वे स्थानकालगतचा परिसर फेरीवालामुक्त करण्याचा निर्णय घेतला होता.

पालिकेने स्थानकालगतचे १५० मीटर क्षेत्रफळ फेरीवालामुक्त करण्याबाबत धोरणच आखून त्याची अंमलबजावणीही सुरू केली होती. मात्र, करोना संसर्ग काळात आणि त्यानंतर निर्बंध लागू करण्यात आल्याने परिसर फेरीवाला मुक्त झाला होता. आता करोनाची तिसरी लाट नियंत्रणात येत असून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पुन्हा एकदा रेल्वे स्थानकालगतचे १५० मीटर क्षेत्र फेरीवालामुक्त करण्याच्या धोरणाची पुन्हा अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने घेतला आहे. पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील रेल्वे स्थानकालगतच्या १५० मीटर क्षेत्रावर नियंत्रण रेषा आखण्याच्या, तसेच फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करणारी वाहने तैनात करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. काही भागांमध्ये या कारवाईला सुरुवात झाली आहे.

निर्बंध शिथील होऊ लागताच कार्यालये सुरू झाली. त्याचबरोबर सर्व बाजारपेठांमध्ये लगबग वाढली. कर्मचारी आता कार्यालयात जाऊ लागले आहेत. परिणामी, रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा रेल्वे स्थानकालगतच्या परिसरात पथाऱ्या पसरून व्यवसाय सुरू केला आहे. फेरीवाल्यांबरोबरच रिक्षाही मोठय़ा संख्येने दिसू लागल्या आहेत.

५४५ हातगाडय़ा जप्त

निर्बंध शिथिल झाल्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचीही संख्या वाढली आहे. वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी अडथळा ठरणाऱ्या या हातगाडय़ांच्या वापरास मनाई आहे. त्यामुळे पालिकेने पुन्हा एकदा हातगाडय़ांविरुद्धची कारवाई तीव्र केली असून आतापर्यंत ५४५ हातगाडय़ा आणि अनधिकृतपणे साठा केलेले स्वयंपाकाचे १६९ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

निर्बंध शिथिल होताच प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. मनाई असतानाही रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकालगतचा १५० मीटर क्षेत्रफळाचा परिसर फेरीवालामुक्त करण्याच्या धोरणाची पुन्हा कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाडय़ांवरही कारवाई करण्यात येत आहे.  -चंदा जाधव, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग