मुंबई : पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धनासाठी मध्य रेल्वे विविध उपक्रम राबवीत असून ‘वृक्षांची जोपासना, हीच देवांची उपासना’ असे जनजागृतीपर फलक मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात लावले आहेत. मात्र या स्थानकाच्या पुनर्विकासात अडथळा ठरणाऱ्या शेकडो झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> ‘एससी’ विद्यार्थी उत्पन्न मर्यादेच्या कक्षेत; बार्टी, सारथी, महाज्योतीसाठी समान धोरण
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात येणार आहे. या स्थानकाच्या फलाट क्रमांक १८ वर प्रवेश केल्यावर कॅफेटेरिया, प्रवाशांसाठी गॅलरी, बसण्यासाठी सोय, वाहनतळासाठी जागा, करमणुकीची सुविधा, फूड कोर्ट, स्थानिक उत्पादनांसाठी जागा, बहुपयोगी मॉल उभारण्यात येणार आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर येथील ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’, हेरिटेज गल्ली इतरत्र स्थलांतरित करण्यात येणार आहे. तसेच या भागातील ७० प्रकारांची औषधी वनस्पती असलेले उद्यान हटवण्यात येणार आहे. त्यामुळे औषधी झाडांचे नुकसान होणार आहे. तसेच आता सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १८ वरील झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे.
सीएसएमटीच्या पुनर्विकासाच्या कामाचे नियोजन सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर किती झाडांचे नुकसान होणार, हे समोर येईल. मात्र, आता किती झाडे कापणार, झाडांचे पुनर्रोपण करणार का, याबाबत माहिती निश्चित झालेले नाही.
– डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे