डॉकयार्ड रोड येथे मंगळवारी झालेल्या अपघातातग्रस्त गाडीमध्ये असलेल्या तंत्रज्ञाने व्हीसीबी यंत्रणेतील दोष दूर करण्याऐवजी थेट पेंटोग्राफमधील दोष दूर करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ट्रान्सफार्मर फुटला आणि अपघात झाला, असे सकृतदर्शनी आढळून आले आहे. हा अपघात गाडी सुरू असताना झाला असता तर त्याचे गांभीर्य वाढले असते, असे सांगण्यात येत आहे.
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसी आणि डीसी दोन्ही विद्युतभारावर हार्बरच्या गाडय़ा चालविण्यात येतात. तशीच मंगळवारी गाडी चालविण्यात येत होती. माहीम येथे दोन्ही विद्युतभारामध्ये बदल होत असल्यामुळे गाडीमध्ये एक तंत्रज्ञ नेहमी मोटरमनसोबत असतो. या गाडीतही तसा एक तंत्रज्ञ होता. माहीम येथे गाडीच्या विद्युतभारात बदल होताना गाडीचा एक पेंटोग्राफ खाली आला. याचे मुख्य कारण होते व्हॅक्युम सर्किट ब्रेकर या यंत्रणेमध्ये निर्माण झालेला दोष! यामुळे त्या पेंटोचा ओव्हरहेड तारेशी संपर्क येत नव्हता आणि त्यामुळे गाडीच्या संपूर्ण वहन यंत्रणेवर ताण येत होता. २५ हजार व्होल्टवरून गाडीचा प्रवाह १५०० व्होल्टवर आला होता. गाडीच्या अन्य दोन पेंटोग्राफवर गाडी पुढे आणण्यात येत असताना त्या तंत्रज्ञाने चालू गाडीतच हा पेंटोग्राफ वर उचलण्यासाठीची यंत्रणा वापरली. यामुळे व्हीसीबी यंत्रणेवर ताण आला आणि ट्रान्सफार्मर फुटला. गाडी रेल्वे स्थानकाजवळ आली असल्यामुळे तिचा वेग कमी होता आणि एका बाजूला फलाट आल्यामुळे त्या बाजूचे प्रवासी कमी प्रमाणात होरपळले. 

Story img Loader