रेल्वे प्रवासी वाहतुकीमध्ये चालू आर्थिक वर्षांत २५ हजार कोटी रुपयांचा तोटा अपेक्षित असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रवासी भाडे किमान तीन ते पाच पैसे प्रतिकिलोमीटर वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनीही या शक्यतेस दुजोरा दिला आहे.
गेल्या १० वर्षांत भाडेवाढ न केल्यामुळे रेल्वेसमोर मोठे आर्थिक संकट उभे आहे. वित्त विभागाने खर्चाची तरतूद रेल्वेनेच करावी, असे सांगितले आहे. त्यातच सहाव्या वेतन आयोगामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी रेल्वेला ७३ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला आहे. रेल्वेने बाजारातून घेतलेले कर्जे १५०० कोटींवर गेले आहे. वित्त विभागाने रेल्वेला ३८ हजार कोटी रुपयांचे सहाय्य द्यावे, ही रेल्वे बोर्डाची विनंती फेटाळण्यात आल्याने आता प्रवासी भाडे पुन्हा एकदा वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
जानेवारी महिन्यामध्ये रेल्वेने दोन वेळा भाडेवाढ केली होती. त्यामुळे रेल्वेला ६६०० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. मात्र त्याचवेळी डिझेलच्या भाडेवाढीमुळे पुन्हा ३८०० कोटीचा खर्च वाढला आहे.
वर्षांत पाच वेळा भाडेवाढ
२०१२-१३चा अर्थसंकल्प सादर करताना प्रथम वर्गाच्या भाडय़ात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सेवा करापोटी प्रथम वर्गावर ऑक्टोबर महिन्यात भाडेवाढ लादली. १ जानेवारीला मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या अधिभारापोटी प्रवाशांना किमान दोन रुपयांची वाढ सोसावी लागली. २२ जानेवारीस प्रतिकिमी दोन ते तीन पैसे वाढ करण्यात आली. आता पाचव्यांदा भाडेवाढ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा