नेरळ ते माथेरान दरम्यान धावणाऱ्या मिनी ट्रेनला युनेस्कोच्या यादीमध्ये जागतिक दर्जा मिळावा म्हणून रेल्वे प्रशासनाने पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. २००९ मध्ये रेल्वेने या गाडीला जागतिक दर्जा मिळावा म्हणून केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले होते.
रेल्वेच्या डोंगराळ प्रदेशात चालणाऱ्या चार रेल्वे गाडय़ांपैकी तीन गाडय़ांना यापूर्वी जागतिक दर्जा मिळालेला आहे. १९९९ मध्ये दार्जिलिंग हिमालय रेल्वे, २००५ मध्ये निलगिरी माऊंटन रेल्वे तर २००८ मध्ये काल्का-सिमला रेल्वे या गाडय़ांना जागतिक दर्जा मिळाला आहे. समुद्र सपाटीपासून २६२५ फूट उंचीवर असलेले माथेरान हे मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाशी १९०७ मध्ये एका मिनी ट्रेनच्या सहाय्याने जोडले गेले असून ही मिनी ट्रेन पर्यटकांची अत्यंत लाडकी गाडी आहे. दोन फुटांच्या नॅरोगेजवर चालणारी ही गाडी १०५ वर्ष प्रवाशांच्या सेवेत आहे. या गाडीला जागतिक दर्जा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून नव्याने तसा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी सांगितले.
युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तूंमध्ये या रेल्वेचा समावेश व्हावा यासाठी सर्वप्रथम २००६ मध्ये प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र २००९ मध्ये हा प्रस्ताव वेगवेगळ्या कारणांसाठी फेटाळण्यात आला होता. जुलै २००७ मध्ये या रेल्वेचा मार्ग मुसळधार पावसामुळे वाहून गेला आणि तब्बल सात महिने ही गाडी बंद होती. पावसाळ्यात बंद असलेल्या या रेल्वेचा होणारा तोटा भरून काढण्यासाठी मध्य रेल्वेने २०१२मध्ये अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू करण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वीही झाल्याचा दावा रेल्वेने केला आहे.

Story img Loader