कर्जत आणि बदलापूर येथून सकाळी मुंबईकडे येणाऱ्या उपनगरी गाडय़ांमधील महिलांच्या डब्यामध्ये मानवी विष्ठा पसरवून ठेवणाऱ्या अज्ञात विकृत व्यक्तीला रोखण्यात मध्य रेल्वे प्रशासनाला अपयश आले आहे. दोन महिने बंद असलेली ही विकृती पुन्हा एकदा डोके वर काढू लागली असून महिला प्रवाशांची ही समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाय करण्याऐवजी प्रशासन हे प्रकार नेमके कोण करत आहे, याचाच शोध घेण्याचे नाटक करत आहे.
कळवा कारशेडमधून सकाळच्या वेळी कर्जत आणि बदलापूर येथे जाऊन पुन्हा छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे निघणाऱ्या उपनगरी गाडीच्या कर्जत दिशेकडील महिलांच्या दुसऱ्या वर्गाच्या आणि पहिल्या वर्गाच्या डब्यामध्ये कोणीतरी मानवी विष्ठा पसरून ठेवत असल्याचे प्रकार काही महिन्यांपूर्वी रोज घडत होते. याबाबत माझगाव येथील विक्रीकर विभागात असलेल्या प्रज्ञा ब्रम्हांडे यांच्यासह काही महिलांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, त्यांच्याऐवजी उपनगरी डब्यांची देखभाल करणाऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे या महिलांना पाठविण्यात आले. या अधिकाऱ्यांनीही या महिलांची केवळ तक्रार ऐकून घेतली. ‘आपण कर्जत, कल्याण किंवा बदलापूर येथील स्थानक प्रमुखांकडे लेखी तक्रार केली आहे का?’ असे विचारत, ‘नेहमी तोंडी तक्रार करता मग लेखी देण्याच्या वेळी कोणी पुढे येत नाही,’ अशी मल्लीनाथी करत या अधिकाऱ्यांनी त्यांची बोळवण केली होती. मात्र त्यानंतर हे प्रकार बंद झाले होते.
सोमवारी बदलापूर (सकाळी ८.१०) आणि शुक्रवारी कर्जत (सकाळी ७.५३) गाडीमध्ये पुन्हा हे प्रकार आढळून आले. कळवा कारशेडमधून गाडी निघते तेव्हा ती पूर्ण स्वच्छ केली जाते का आणि केली जात असेल तर मग मधल्या स्थानकांमध्ये कोणी हा प्रकार जाणूनबुजून करतो का याची तपासणी नेमकी कोणी करायची हे प्रश्नचिन्ह अद्याप सुटलेले नाही.
रेल्वे पोलिसांकडेही या बाबत तक्रार करण्यात आली होती. मात्र असे काही कोणी करताना आढळले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कळवा येथे गाडी रात्रभर उभी असते, त्यावेळी तेथील कर्मचारी गाडीची स्वच्छता करत असले तरी सकाळी गाडी कारशेडमधून बाहेर पडताना तिची पुन्हा तपासणी होणे आवश्यक असते. तशी तपासणी या गाडय़ांची नियमित होते का या बाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. डब्यात महिलांना प्रवेश करता येणार नाही, अशी पद्धतीने संपूर्ण डब्यामध्ये मानवी विष्ठा विखरून टाकण्यात येते. महिला या डब्यामधून दुसऱ्या डब्यामध्ये जातात किंवा कल्याण येथे आल्यावर गाडी थांबविण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांची दखल घेतली जात नाही, असे ब्रम्हांडे यांनी सांगितले.    

डबा स्वच्छ करण्यासाठी गाडीचा खोळंबा
कर्जत येथून मुंबईकडे येणाऱ्या ७.५३ ची उपनगरी गाडीच्या महिला डब्यात झालेली घाण साफ करण्यासाठी शुक्रवारी सकाळी कल्याण स्थानकात ही गाडी १५ मिनिटे रोखून धरण्यात आली. मात्र तात्पुरती स्वच्छता करून ती गाडी पुढे रवाना करण्यात आल्याची तक्रार महिलांनी केली आहे.

Story img Loader