लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वगाड्या सोडल्या आहेत. त्यांचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच प्रतीक्षा यादी पूर्ण झाली. ऑगस्ट महिन्यात सलग सुट्ट्या आणि सणाच्या निमित्ताने मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, या कालावधीत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा संपल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत.

स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधननिमित्त सलग सुट्ट्यामध्ये मुंबई ते चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडीदरम्यान स्वतंत्र विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

आणखी वाचा-Mumbai Crime : धक्कादायक! सोसायटी मिटिंगमध्ये वाद, अध्यक्षाने चक्क दाताने सदस्याचा अंगठा तोडला; घटनेने खळबळ

१५ ते १९ ऑगस्टपर्यंत सलग सुट्ट्या आल्याने, मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांतील आरक्षणासाठी भलीमोठी प्रतीक्षा यादी आहे. तर, १४ ऑगस्टच्या रात्रीपासूनच्या रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा पार केल्याने ‘रिग्रेट’चा संदेश दाखवण्यात येत आहे. ‘रिग्रेट’ हा अनावर गर्दीचा निदर्शक आहे. तसेच, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा लागून आलेल्या सुट्टीमुळे रेल्वेगाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रतीक्षा यादी आणि अनारक्षित प्रवाशांची संख्या पाहता चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडीसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडणे अपेक्षित आहे.

आणखी वाचा-मुंबई : आरोपीचा दीडशे किलोमीटर पाठलाग आणि अखेर मध्य प्रदेशात अटक

त्यापूर्वी, २६ जानेवारी २०२४ रोजी सुट्टीच्यावेळी जादा रेल्वेगाड्या न सोडल्याने आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांनी वातानुकूलित डब्यांतही गर्दी केली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, येथून चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडीदरम्यान स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधनानिमित्त विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीकडून केली आहे.

सण-उत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांना कायम गर्दी असते. त्यात सलग सुट्टी असल्यास, प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी जादा रेल्वेगाड्या सोडणे आवश्यक आहे, असे कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway waiting list is full due to consecutive holidays mumbai print news mrj