* प्रवासी आक्रमक होण्याच्या घटनांमध्ये वाढ
*आता जागरूकता मोहीम राबवणार
उपनगरीय रेल्वे स्थानकांवर किंवा लांब पल्ल्याच्या गाडय़ांत आपल्या आक्रमक देहबोलीतून तिकीटधारक प्रवाशांवरही वचक ठेवणारे तिकीट तपासनीस आणि त्यांच्या आक्रमकपणामुळे हतबल झालेले प्रवासी, हे चित्र सध्या बदलले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिकीट तपासनीसांविरोधात आक्रमक झालेले प्रवासी आणि अक्षरश: जीव मुठीत धरून काम करणारे तिकीट तपासनीस, असे चित्र रूढ झाले आहे. रेल्वे प्रशासनाने गेल्या काही दिवसांत घडलेल्या तीन-चार प्रसंगांबाबत काळजी व्यक्त करत प्रवाशांमध्ये जागरूकता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी तिकीट तपासनीसांसह सहकार्य करावे, अशी मोहीम आता रेल्वे प्रशासन राबवणार आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांत घडलेल्या घटनांपैकी पहिल्या घटनेत मुंबईकडे येणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या एका माजी आमदाराचा साडेपाच लाखांचा मौल्यवान ऐवज चोरीला गेला होता. या डब्यातील कुपे आतून बंद असूनही या माजी आमदाराने तिकीट तपासनीसावर संशय घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. आता या तिकीट तपासनीसाला दर दिवशी पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत आहेत.
दुसरी घटनाही कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्येच घडली. या घटनेत प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या एका राजकीय नेत्याच्या महिला कार्यकर्त्यांनी तिकीट तपासनीसावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या आठ-दहा महिला कार्यकर्त्यां साधारण श्रेणीचे तिकीट काढून आरक्षित डब्यात शिरल्या होत्या. त्यांनी मुख्य तिकीट तपासनीस आर व्ही. वर्मा यांना पकडत आपल्याला आसन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. वर्मा यांनी असमर्थता दर्शवताच या महिलांनी त्यांना घेराव घातला. वर्मा यांनी दुसऱ्या डब्यात जात त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली.
बदलापूर येथे घडलेली तिसरी घटना तिकीट तपासनीस सुधाकर पारेख यांच्या जीवावर बेतली असती. संध्याकाळी चार ते रात्री १२ या पाळीत कामावर असताना पारेख यांनी रात्री साडेआठच्या सुमारास दोन प्रवाशांना तिकीट विचारले. त्यापैकी एक तिकीट दाखवत असताना दुसऱ्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अंदाज चुकल्याने तो रुळांवर पडला. या प्रवाशाला काहीही दुखापत झाली नसली, तरी प्लॅटफॉर्मवरील इतर प्रवाशांनी त्यासाठी तिकीट तपासनीसालाच जबाबदार धरले. जमाव जमल्यावर घाबरलेल्या पारेख यांनी स्वत:ला कोंडून घेतले. अखेर रेल्वे सुरक्षा दलाने मध्यस्थी केल्यावर जमाव पांगला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण पाहिले असता या प्रकरणात पारेख यांची काहीच चूक नसून प्रवाशानेच दंडाचे पैसे वाचवण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या प्रवाशाने कल्याण येथे जाऊन पारेख यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली.
या तीनही घटना तिकीट तपासनीसांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करायला लावणाऱ्या आहेत. कामावर असलेल्या तिकीट तपासनीसांवर अशा प्रकारे दबाव टाकणे, हा अपराधही आहे. त्याचप्रमाणे त्यामुळे तपासनीसांमध्ये भीतीचे वातावरण तयार होते. याआधीही हार्बर मार्गावर महिला तिकीट तपासनीसाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे आता प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करणार आहे, असे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. आलोक बडकुल यांनी सांगितले.
तिकीट तपासनीस अरेरावी करत असल्याच्या तक्रारी प्रवासी संघटना सातत्याने करत असतात. त्यात तथ्य आढळल्यावर संबंधित तपासनीसांवर कारवाईही झाली आहे. मात्र प्रवाशांनी तिकीट तपासनीसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. शक्यतो अधिकृत तिकिटाशिवाय प्रवास करू नये. तसा केल्यावर तिकीट तपासनीसाने पकडल्यास योग्य दंडाची रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. बडकुल यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway worry over incident increasing of passenger argument with ticket collectors
Show comments