मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नुकत्याच आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना यांनी मुंबई विभागातील ३, भुसावळ विभागातील ४, नागपूर विभागातील दोन, पुणे आणि सोलापूर विभागातील एक रेल्वे कर्मचाऱ्याला सुरक्षा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अशा राज्यातील ११ रेल्वे कर्मचाऱ्यांच्या धडाडीच्या कामगिरीबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला.

मार्च महिन्यात कर्तव्यादरम्यान सतर्कता, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे वाहतुकीत सुरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांच्या योगदानाबद्दल कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तीपत्रक आणि दोन हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले.

मुंबई विभागातील कुर्ला येथील लोको पायलट प्रीतम कुमार यादव यांनी दादर येथे प्रशिक्षण सत्रादरम्यान, रेकच्या रिकाम्या डब्या मधून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी ताबडतोब कर्तव्यावरील स्थानक व्यवस्थापक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) यांना कळवले. पॉइंट्समन आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान टाळण्यास मदत झाली. मुंबई विभागातील पनवेल येथील ट्रेन व्यवस्थापक रोहित कोळी हे मालगाडीमध्ये कर्तव्यावर होते. यावेळी त्यांना दातिवली-डोंबिवली विभागादरम्यान लगतच्या रेल्वे मार्गावर एक लोखंडी तुकडा पडलेला दिसला. त्यांनी धोक्याचा इशारा देऊन रेल्वे मार्गावरून येणारी भुसावळ-पनवेल रेल्वेगाडी ताबडतोब थांबवली. त्यानंतर लोखंडी तुकडा काढून भुसावळ-पनवेल रेल्वेगाडी सुरक्षितपणे सोडण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

मुंबई विभागातील लोणावळा येथील पॉइंट्समन कुणाल पारिसकर कर्तव्यावर असताना, गाडी क्रमांक २२७३१ हैदराबाद-मुंबई अतिजलद एक्स्प्रेससोबत सिग्नलची देवाणघेवाण करताना, त्या रेल्वेगाडीच्या एका डब्यातून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ स्थानक व्यवस्थापकांना कळवले. त्यानंतर डबा वेगळा करून, रेल्वेगाडी सुरक्षितपणे सोडण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळण्यास मदत झाली.

भुसावळ विभागातील कनिष्ठ अभियंता (कॅरीज आणि वॅगन) नरेंद्र गावशिंदे, लोकेश सेजकर, तंत्रज्ञ (सी अँड डब्ल्यू) अमरेंद्र कुमार, पाॅइंट्समन अनिल कुमार वर्मा; नागपूर विभागातील ट्रेन व्यवस्थापक संजीव कुमार, तंत्रज्ञ (सी अँड डब्ल्यू), मनीषा पारधे; पुणे विभागातील कनिष्ठ अभियंता पीडब्ल्यूआय मुकेश रवींद्र आणि सोलापूर विभागातील ईएसएम समाधान प्रभू यांना गौरविण्यात आले.

याप्रसंगी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना आणि कर्तव्यांप्रती असलेल्या त्यांच्या सतर्कतेचे आणि समर्पणाचे कौतुक करताना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना म्हणाले, अशा सतर्कता आणि शौर्याच्या कृतींमुळे इतरांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि जीवित, मालमत्तेचे आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा मिळेल. यावेळी अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी चंद्र किशोर प्रसाद आणि मध्य रेल्वेचे इतर विभाग प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.