मुंबई : मध्य रेल्वेवरील अत्यंत जुन्या ३५ पादचारी आणि उड्डाणपुलांच्या सुरक्षा पाहणीनंतर सात पुलांचा वापर बंद केला गेला आहे, तीन पुलांची दुरुस्ती झाली आहे, तर एका पुलाची दुरुस्ती सुरू आहे. १२ पुलांची किरकोळ दुरुस्ती लवकर होणार आहे. मुंबईच्या आयआयटीने ही पाहणी केली.
भायखळा, करी रोड, चिंचपोकळी आणि घाटकोपर या चार पुलांचे काम सुचवले होते. त्यात घाटकोपरच्या पुलाखाली अतिरिक्त पादचारी रस्ता काढला असून करी रोड आणि चिंचपोकळी येथील वाहतुकीसाठी वापरत असलेल्या पुलांवर डांबराचा अतिरिक्त थर दिल्याने त्याच्यावरील वजन वाढले आहे. महापालिकेशी समन्वय साधून अतिरिक्त थर काढून त्यावर आयआयटीने सुचवल्या प्रमाणे आवश्यक तेवढेच डांबरीकरण केले जाण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी भाजपचे शहर अध्यक्ष आशीष शेलार यांच्याशी झालेल्या चर्चेत ही माहिती दिली. रेल्वे पुलांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शेलार यांनी त्यांची भेट घेतली होती.