मुंबई : रेल्वे अपघातात घरातील कर्त्यां व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना, नातेवाईकांना ५० हजार रुपयांची रक्कम भरपाई म्हणून रेल्वेकडून देण्यात येत होती. तर गंभीर जखमींना २५ हजार देण्यात येत होते. मात्र, २०१२ नंतर तब्बल ११ वर्षांनी भरपाईच्या रकमेत दहापटीने वाढ करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५० हजारांवरून पाच लाख रुपये आणि गंभीर जखमींना २५ हजारांवरून अडीच लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> तृतीयपंथीयाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
११ वर्षांत रेल्वे अपघातात मृत्यू आणि गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे कुटुंबीय तुटपुंज्या आर्थिक भरपाईने घर सावरण्याचे प्रयत्न करत होते. भरपाईची रक्कम मिळण्यासाठीदेखील त्यांना अनेकदा रेल्वे कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत होते. मात्र, रेल्वेमंडळाने नुकसानभरपाईची रक्कम जवळपास दहापटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत रेल्वेमंडळाने १८ सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वेमधील सर्व महाव्यवस्थापकांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा >>> गर्भाशयाच्या फायब्रॉईड्समुळे करावा लागतोय वंध्यत्वाचा सामना!
अपघाती मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या वारसांना, नातेवाईकांना ५० हजारांवरून ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रकमेत जवळपास साडेचार लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गंभीर जखमींना २५ हजार रुपयांवरून अडीच लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच किरकोळ जखमींना पाच हजारांऐवजी ५० हजार रुपये देण्यात येतील.