गणेशोत्सवानिमित्त मुंबई महानगर परिसरातून कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वेगाडय़ाही सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वे गाडय़ा सोडण्याची मागणी राज्य सरकारतर्फे  केंद्र सरकारकडे केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. तर मुख्यमंत्र्यांकडे एसटी नियोजनाचा अहवालही सादर केला असून दोन ते तीन दिवसांत यावरही निर्णय होईल,असे स्पष्ट करण्यात आले.

२२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. दरवर्षी राज्यातील अन्य शहरांबरोबरच मुंबई महानगर परिसरातूनही मोठय़ा संख्येने गणेशभक्त कोकणात जातात. यासाठी रेल्वेकडून नियमित गाडय़ांबरोबरच विशेष गाडय़ाही मोठय़ा प्रमाणात सुटतात. तर एसटी महामंडळाकडूनही जादा बसगाडय़ांचे नियोजन केले जाते. याशिवाय खासगी बस आणि वाहनेही जातात. परंतु यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या टाळेबंदीमुळे कोकणासाठी अद्यापही रेल्वे किंवा एसटी सोडण्याचे नियोजन झालेले नाही. तर खासगी बस किंवा चार चाकी वाहनाने गेल्यास मोठा भुर्दंडही पडू शकतो. त्यामुळे विशेष रेल्वे आणि एसटी सोडण्याची मागणी कोकणात जाणाऱ्यांकडून होत आहे. एसटी महामंडळाने कोकणात जाण्यासाठी तीन हजार बसगाडय़ांचे नियोजन करतानाच मूळ तिकीट आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याने त्यांना एसटीचा अहवालही सादर केला आहे. यावर दोन ते तीन दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. याशिवाय अनेक कोकण प्रवासी संघटनांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी रेल्वेगाडय़ा सोडण्याची मागणी केली आहे. ही मागणी लक्षात घेता विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्याची मागणी केंद्राकडे करणार असल्याची माहिती परब यांनी दिली.

होणार काय?

विशेष रेल्वे गाडय़ा सोडल्या तर या गाडय़ांचे आरक्षण, प्रवास नियम व अटी पाळूनच त्या सोडण्याचे नियोजन होईल. सध्या ५ ऑगस्टपर्यंतच कोकणात दाखल होऊन १४ दिवसांसाठी विलगीकरण करण्याचा निर्णय अनेक गावांनी घेतला आहे. त्यामुळे विलगीकरणाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवूनच राज्य सरकारला रेल्वे व एसटी गाडय़ांच्या नियोजनाबाबत लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे.

Story img Loader