लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या बहुतांश भागात बुधवारी उन्हाळी पाऊस आणि गारपिटीचा जोर राहणार आहे. अकरा जिल्ह्यांना नारंगी तर उर्वरीत जिल्ह्यांना पिवळा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारपासून पाऊस आणि गारपिटीचा जोर कमी होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून येत असलेले बाष्पयपक्त वारे आणि तापमान वाढीमुळे जास्त उंचीचे ढग तयार झाल्यामुळे पुढील चार दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. आज, बुधवारी उन्हाळी पाऊस आणि गारपिटीचा जोर जास्त राहणार आहे.
हवामान विभागाने पाऊस आणि गारपिटीसाठी अमरावती, चंद्रपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे, सांगली आणि सातारा जिल्ह्याला नांरगी आणि सोलापूर वगळता उर्वरीत महाराष्ट्राला पिवळा इशारा दिला आहे.
गारपिटीचा धोका वाढला
मध्य महाराष्ट्रावर जमिनीपासून ९०० मीटर उंचीवर हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यापासून तमिळनाडूपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बंगालचा उपसागरातून जमिनीपासून तीन किलोमीटर उंचीपर्यंत बाष्पयुक्त वारे येत आहेत. तर अरबी समुद्रातून तीन किलोमीटरहून जास्त उंचीवरून बाष्पयुक्त वारे येते आहेत. अशा स्थितीत उंच ढगांची निर्मिती होऊन गारपिटी होण्याचा धोका वाढला आहे. मंगळवारी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पाऊस आणि गारपिटीची नोंद झाली आहे.