पावसाळ्यापूर्वी काम करण्याचा दावा फोल.
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगेच्या पायऱ्यांच्या दुरुस्तीचे काम आधीच रडतखडत सुरू असताना आता पावसाचा अडथळा आल्याने ते आता आणखी काही कालावधीसाठी रखडणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येईल, असा दावा पुरातत्त्व खात्याकडून करण्यात आला होता. परंतु तो दावा आता फोल ठरला आहे.
वाळकेश्वरमधील बाणगंगा आणि आजूबाजूच्या परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे. या ठिकाणी सध्या वाळकेश्वर, गौड सारस्वत ब्राह्मणांचे मठ आणि अनेक प्राचीन शिल्पे आहेत. बाणगंगेवर पूर्वी बसविण्यात आलेल्या पायऱ्यांच्या दगडांची मोठय़ा प्रमाणावर झीज झाली होती. तसेच, ठिकठिकाणी या पायऱ्या गुळगुळीत व निसरडय़ा झाल्याने त्यावर घसरून अनेक भाविक जखमी होत होते. त्यामुळे या पायऱ्यांच्या दुरुस्तीचे काम मार्च महिन्यापासून सुरू करण्यात आले. पूर्वीच्या दगडी पायऱ्यांच्या जागी येथे कोल्हापूरहून आणलेले बेसाल्ट दगड बसविण्यात येत आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक कारागीर गाव गाठण्याच्या तयारीत आहेत. त्या आधी दोन महिने लग्नसराईचा मोसम असल्याने कामगार सातत्याने रजेवर असतात. परिणामी गेल्या दोन महिन्यांत अर्धे बांधकामही पूर्ण झालेले नाही.
बेसाल्ट दगडासह वाहनही उपलब्ध नाही
बेसाल्ट दगडाचे वैशिष्टय़ म्हणजे हे दगड १५०-२०० वर्षे टिकतात. तसेच हे दगड कालांतरानेही गुळगुळीत होत नसल्याने यावरून घसरून पडण्याची शक्यताही फार कमी असते. मात्र प्रचंड मोठय़ा आकाराचे आणि वजनाचे हे दगड कोल्हापूरहून आणण्यास बराच अवधी लागत आहे. दगड बसविण्यासाठी अहमदनगर, कोल्हापूर अशा भागांतून २५ ते ३० कारागिरांना आणण्यात आले आहे. तसेच या दगडांना आणण्यासाठी मोठी वाहनेही उपलब्ध होत नसल्याने बांधकामासाठी लागणारा दगडही कित्येकदा वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे हे बांधकाम रडतखडत सुरू आहे.