मुंबई : गेले काही दिवस मुंबईमध्ये पावसाने उसंत घेतल्याने उन्हाचा कडाका वाढला होता. मात्र बुधवारी सकाळपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दरम्यान, मुंबईत गुरुवारी हलक्या पावसाचा, तर शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने बुधवारी मुंबईत पुनरागमन केले. शहराच्या विविध भागात दिवसभर पावसाच्या सरी कोसळल्या. सायंकाळी ४ नंतर काही भागात पावसाचा जोर वाढला होता. दरम्यान, मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ८ मिमी पावसाची नोंद झाली. सलग तीन दिवसांच्या उष्णतेनंतर बुधवारी कमाल तापमानात घट झाली. कुलाबा केंद्रात ३० अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३०.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रात तापमान ४ ते ६ अंशानी कमी नोंदले होते.
हेही वाचा >>>वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला साडेतीन लाखांची लाच स्वीकारताना अटक
यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात विश्रांती घेतली. त्याचबरोबर वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन कारावा लागत आहे. बुधवारी सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळाला.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात या आठवड्यात पावसाची शक्यता नव्हती. मात्र, अरबी समुद्रात केरळ किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीतून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानुसार पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह इतर जिल्ह्यांतही पुढील दोन – तीन दिवस वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.