गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेली पावसाची संततधार रविवारीही कायम आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही पावसाच्या सरी पडत आहे. दरम्यान, पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या दहा मिनिटे उशीराने धावत असल्याची माहिती मिळाली आहे. बेस्टची बस वाहतूक सुरळीत आहे.
रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत मुंबईमध्ये ७९.५२ मिमी, पूर्व उपनगरामध्ये ७६.५० मिमी आणि पश्चिम उपनगरांमध्ये ५७.८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्याही उशीराने धावत असून, कोकण रेल्वेच्या गाड्या पनवेलपर्यंतच धावत आहेत. कोकण कन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस आदी गाड्या पाच ते सहा तास उशीराने धावत आहेत.
रत्नागिरीतही जलधारा
रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस पडत असून, जिल्ह्यामध्ये रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत १९५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये २२३ ते २२५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.