मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावार नुकसान झाले होते. आता गुरूवारपासून पुन्हा एकदा राज्यातील बहुतांशी भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ७ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गुरूवारी प्रामुख्याने विदर्भ पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडय़ात पाऊस हजेरी लावेल. शुक्रवार, शनिवारी पावसाची व्याप्ती काहिशी वाढणार असून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी सरासरी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस असल्याचे दिसत आहे.
कारण काय? पश्चिम आणि दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारे एकत्र आल्यामुळे चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ापासून तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या भागांमध्ये दमट वारे निर्माण झाले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानात झालेली वाढदेखील अवकाळी पावसाला कारणीभूत असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले.