पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून अशा विरुद्ध दिशांनी येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम म्हणून राज्याच्या अनेक भागांत शनिवारी गडगडाटासह वादळी पाऊस आणि गारपीट झाली. तसेच काही ठिकाणी विजा कोसळल्याचे प्रकार घडले असून, त्यात तासगाव तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला. नाशिक, धुळे जिल्ह्य़ालाही जोरदार फटका बसला असून, निफाड तालुक्यात वादळाने पत्र्याचे शेड अंगावर पडल्याने शेतमजुराचा मृत्यू झाला. येथील हजारो हेक्टरवरील द्राक्ष, कांदा, डाळिंब, गहू यासह इतर पिकांचे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच रायगड जिल्ह्य़ातही अनेक भागांत शनिवारी पहाटे जोरदार सरी कोसळल्या. राज्यात अनेक ठिकाणी शनिवारी पहाटे आणि दुपारनंतरही वादळी पाऊस, गारपिटीचा फटका बसला. पुणे जिल्ह्य़ात शिरूर परिसरात गारपीट झाली. शिरूरजवळ वीज कोसळून गाय व म्हशीचा मृत्यू झाला. सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ांतही पाऊस व गारपीट झाली. तासगाव तालुक्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्य़ातही जोरदार पाऊस झाला. निफाड तालुक्यात वादळाने पत्र्याचे शेड अंगावर पडल्याने लक्ष्मण जनक कांबळे या शेतमजुराचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्य़ात १४४ गावांतील ९४१९ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. मराठवाडय़ाच्या बहुतांश भागात पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. नगर जिल्ह्य़ात सायंकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. द्राक्षे, कांदा, डाळिंब, ऊस व गहू पिकांचे नुकसान झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा