मुंबई : उत्तर भारतातील काही भागांतून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. काही दिवसांतच महाराष्ट्रातूनही मोसमी वारे माघारी परतण्यास सुरुवात होईल. दरम्यान, मुंबईत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिली. परिणामी मुंबईतील तापमानात वाढ होऊ लागली आहे. यादरम्यान काही भागात पावसाच्या तुरळक सरी वगळता हवामान कोरडे राहील, असा अंदाज आहे.

मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू असताना अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषत: कोकण, पुणे आणि मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला. घाट परिसरात चांगला पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील काही भागात तापमान वाढीला सुरुवात झाली आहे. वातावरणातील उष्णता वाढू लागली आहे. यामुळे असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३३.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवड्यात पाऊस, तर आता उन्हाचा चटका वाढू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – तिसऱ्या फेरीत नव्या महाविद्यालयांतील जागांचा समावेश ? सीईटी कक्षाचे संकेत; दुसऱ्या फेरीला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

हेही वाचा – मुंबई : मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल; रात्रीच्या कसारा, कर्जत लोकल लवकर सुटणार

महाराष्ट्रातून ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. दरम्यान, मुंबईत मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास साधारणपणे ८ ऑक्टोबरपासून सुरू होतो. मात्र मागील काही वर्षे यामध्ये सातत्याने बदल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत २०२२ मध्ये मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास २३ ऑक्टोबर रोजी सुरू झाला होता, तर २०२१ मध्ये १४ ऑक्टोबर रोजी मोसमी वारे परतले. हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या नोंदीनुसार २०२० मध्ये सर्वात उशिरा म्हणजे २८ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती.