मुंबई : पश्चिमेकडून येणारे थंड वारे अरबी समुद्रावरून उत्तर कोकणात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आठवडाअखेरीस शनिवार, रविवारी उत्तर कोकणात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी विक्षोप अर्थात पश्चिमेकडून येणारे थंड वारे आठवड्याच्या अखेरीस शनिवार, रविवारी अरबी समुद्रावरून उत्तर कोकणात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मुंबईसह ठाणे, पालघर, डहाणू परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यासह हवामान विभागाने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
हेही वाचा >>>दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप
दरम्यान, दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे मंगळवारपासून (सात जानेवारी) पुढील काही दिवस थंडी कमी होणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे, तर राज्याच्या बहुतेक भागात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.
थंडी आणखी तीन दिवस ?
पुढील तीन दिवस म्हणजे शुक्रवारपर्यंत माफक थंडीचा अनुभव मुंबईसह संपूर्ण कोकण व महाराष्ट्रात जाणवेल. मंगळवारी मुंबईसह कोकणात पहाटेचे किमान तापमान सरासरीच्या खाली जाणवले असून, मुंबई, सांताक्रूझ येथे तर किमान तापमान सरासरीच्या दोन अंश खाली, १५.२ अंश सेल्सिअस होते. शनिवारपासून (११ जानेवारी) मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा प्रभाव काहीसा कमी होईल कमी होईल, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कदाचित काहीसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शनिवारपासून बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रावर आर्द्रता येण्याच्या शक्यतेमुळे काहीसे ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.