जून महिना संपत आला तरी मुंबईत मुसळधार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. मागील २४ तासांत सांताक्रूझ केंद्रात ४.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली तर, कुलाबा केंद्रात शून्य पावसाची नोंद आहे. परंतु, ठाणे, पालघर, दक्षिण कोकणात सरी कोसळत आहेत. मात्र तेथेही सरासरीच्या तुलनेत पाऊस कमीच आहे.
मुंबई आणि उपनगरांत मोसमी पावसाची संथगतीच आहे. गेले काही दिवस अधून मधून एखाद दुसरी सर पडते. मात्र, गुरुवारी पावसाने दडी मारली. त्यामुळे मुंबईच्या तापमानात देखील वाढ होत असून मुंबईकरांना उकड्याला तोंड द्यावे लागते आहे. तर, दुसरीकडे उत्तर आणि दक्षिण कोकण भागात पावसाचा जोर काहीसा वाढला आहे.
आठवडाअखेरीस मुंबई आणि उपनगरांत पाऊस पुन्हा जोमाने परतेल –
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा अभाव, अरबी समुद्रातील वाऱ्यांचा मंदावलेला वेग, इतर कोकण किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा क्षीण झाल्यामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे. यासह मुंबईकडील पाऊस उत्तरेकडे सरकल्याने पालघर, डहाणू येथे पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत आहे. दरम्यान, आठवडाअखेरीस मुंबई आणि उपनगरांत पाऊस पुन्हा जोमाने परतेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
कुठे किती पाऊस? –
मागील २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे २३ मिमी, दापोली येथे ३० मिमी, गुहागर येथे ८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये १५ मिमी, शहापूरमध्ये ४५ मिमी, मुरबाडमध्ये १५ मिमी, अंबरनाथमध्ये १८ मिमी, कल्याणमध्ये ३६ मिमी, पालघरमध्ये १९.२ मिमी, वाडयामध्ये २८ मिमी, विक्रमगडमध्ये ३४ मिमी, रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये १८ मिमी, सुधागडमध्ये १६ मिमी, माथेरानमध्ये ९२.२ मिमी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये १५ मिमी, मालवणमध्ये ४८ मिमी, सावंतवाडीमध्ये ३३ मिमी, देवगडमध्ये ३५ मिमी, मुळडेमध्ये २६.६ मिमी पाऊस पडण्याची नोंद झाली आहे. तर, मुंबईत फक्त ४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.