लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून संध्याकाळी किंवा रात्री पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात खूप वाढ झाली असून उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. त्यातच हवामान विभागाने आता पावसाचा इशारा दिला आहे.
आणखी वाचा- नागपूरसह विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी, मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा
मुंबईमध्ये दिवसभर हवामान ढगाळ राहणार असून शहर व उपनगरात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः संध्याकाळी किंवा रात्री पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना, हिंगोली, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पुढील तीन – चार तास वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.