पुणे, मुंबई : राज्यामध्ये मोसमी पाऊस पुढील आठवडाभर क्षीण राहणार आहे. अनेक भागात सध्या खरिपातील पेरण्या सुरू असून, दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हवामान विभागाचा अंदाज आणि जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन पेरणीबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणीच हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, कोकणात मात्र बहुतांश ठिकाणी पाऊस होणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत घाई न करण्याचा सल्ला दिला आहे.
राज्यात गेल्या आठवड्यात किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा कार्यरत होता. पश्चिमी वाऱ्यांमुळे समुद्रावरून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत असल्याने मोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले होते. त्याचा परिणाम म्हणून कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार, तर मराठवाड्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.