मुंबई : मराठी चित्रपटांना बहुपडदा चित्रपटगृहात कमी प्रयोग मिळणे, नाट्यगृहांची दुरवस्था, भरमसाठ शुल्क, नवोदित कलाकार व तंत्रज्ञांच्या व्यथा, अनुदानाची कमतरता आदी विविध मुद्दे मनोरंजनसृष्टीतून नेहमीच उपस्थित होत आले आहेत. हे लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी मनोरंजनसृष्टीसाठी तसेच कला क्षेत्रासाठी राजकीय पक्षांनी जाहिरनाम्यातून आश्वासनांचा पाऊस पाडत कलाकार मंडळींना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि कॉंग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीने आपल्या ‘महाराष्ट्रनामा’ या संयुक्त जाहीरनाम्यात मराठी चित्रपटांचे सध्याचे अनुदान २० टक्क्यांनी वाढवणार, तंत्रज्ञ, कलाकार, बॅकस्टेज कलाकार व त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा ध्यानात घेऊन त्यांच्यासाठी विशेष साहाय्यकारी योजना, चित्रपट व पुस्तकांची पायरसी रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी, मराठी माहितीपटांच्या (डॉक्युमेंटरी) निर्मितीसाठी अनुदान देणार आदी विविध घोषणा केल्या आहेत.
हेही वाचा – आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
दादर – माहीम विधानसभेतून पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या मनसेच्या अमित ठाकरे यांनीही आपल्या मतदारसंघासाठीच्या ‘व्हिजन‘ जाहिरनाम्यातून विशेष घोषणा केल्या आहेत. माटुंगा रोड परिसरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व प्रभादेवीमधील रवींद्र नाट्य मंदिर येथे कलाकार व तंत्रज्ञांना आवश्यक सोयी-सुविधा आणि नाटक, एकांकिकांचा सराव करण्यासाठी वेगळ्या प्रशस्त जागेची व्यवस्था मोफत करणार, तरूणाईला स्वस्तात व उपयुक्त शिक्षण मिळण्यासाठी सांस्कृतिक कला केंद्र उभारणार असल्याचे आश्वासन अमित यांनी जाहीरनाम्यातून दिले आहे. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई दौऱ्यावर असताना उत्तर प्रदेशात जागतिक स्तरावरील चित्रनगरी उभी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (उद्धव ठाकरे) स्वतंत्र वचननाम्यात चित्रनगरीसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करत अप्रत्यक्षपणे योगी आदित्यनाथ यांना टोला हाणला आहे. मुंबईतील बॉलीवूड उद्योग इतर राज्यांनी पळवण्याचा प्रयत्न करूनही मुंबई न सोडणाऱ्या बॉलीवूडसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज नवीन चित्रनगरी आणि मराठी चित्रपट व मालिकांसाठीही नावीन्यपूर्ण चित्रनगरी उभारणार असल्याचे जाहीरनाम्यात नमूद केले आहे. तसेच चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रकला आदी कला शिक्षण देणाऱ्या शासकीय संस्थांना अधिक अनुदान आणि नव्या सोयी-सुविधांसाठी अतिरिक्त खर्चाची तरतूद, तरुण, महिला आणि ग्रामीण कलावंतांना कला सादरीकरण, प्रदर्शन आणि विक्रीसाठी प्रमुख शहरांत कलादालने स्थापन करणे, राज्य शासनाने पूर्वी मंजूर केलेल्या मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागेवरील मराठी रंगभूमी दालनाची योजना पूर्ण करणार असे शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) वचननाम्यात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा – भायखळ्यातील प्रचारात विकासकामांचा लेखाजोखा
भाजपने त्यांच्या ‘संकल्प पत्र’ या जाहीरनाम्यात सांस्कृतिक वारसा आणि संवर्धनावर भर दिला आहे. विविध कलांना प्रोत्साहन आणि कलाकारांच्या कौशल्य प्रदर्शनासाठी ललित कला अकादमीची एक शाखा महाराष्ट्रात स्थापन करणे, स्थानिक वारसा स्थळे, ऐतिहासिक स्मारके, कारागीर, कलावंत आणि कला प्रकारांना उत्तेजन देण्याच्या हेतूने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सांस्कृतिक समितीची स्थापना व त्यासाठी संबधित कायद्यामध्ये आवश्यक बदल, गोंधळ, दशावतारी खेळे आणि तत्सम पारंपरिक कला प्रकार, तसेच पारंपरिक कारागिरीचे योग्य दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) करून त्याचे बुद्धी संपदा हक्क संपादन करणे, त्यांचे मूळ स्वरूप वाचवणे आदी मुद्दे या जाहीरनाम्यात आहेत.