महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये पाऊस कोसळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या विविध शहरांमध्ये पाऊस पडत होता. मात्र मुंबईत पावसाने दडी मारली होती. आज अखेर मुंबईत पाऊस सुरु झाला आहे. काही भागात पाणीही साठलं आहे. मुंबईत पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागांमध्ये पाऊस सुरु झाला आहे. हवामान खात्याने यलो अलर्टही जारी केला आहे. त्याचप्रमाणे विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे

कल्याण, डोंबिवली, ठाण्यात जोरदार पाऊस

कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यातही पावसाच्या जोरदार सरी सुरु झाल्या आहेत. सकाळपासून पावसाच्या धारा कोसळत आहेत. पुढच्या चार ते सहा तासांत या भागांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर कोसळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, विविध भागात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

हे पण वाचा- विश्लेषण : मुंबई, पुण्यात फळभाज्या का कडाडल्या?

एक्सवर #MumbaiRain

X या सोशल मीडिया हँडलवर मुंबईकरांनी #MumbaiRain हा हॅशटॅग दिला आहे तसंच त्यात पावसाचे विविध फोटो, व्हिडीओ मुंबईकर पोस्ट करत आहेत. घाटकोपर, कुर्ला या भागांमध्ये चांगला पाऊस पडतो आहे. स्टेशवरच्या पावसाचे, तसंच विविध भागांमधले फोटोही मुंबईकर पोस्ट करत आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण मुंबईतले फोटोही या हॅशटॅगसह अनेकांनी पोस्ट केले आहेत. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. उपनगरातील बोरिवली, मालाड, कांदिवली, गोरेगाव परिसरात पावसाचा अधिक जोर दिसून येत आहे.

शेतकरी बांधवांना महत्त्वाचं आवाहन

राज्यात सध्या काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे. ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी योग्य पाऊस झालेला नसतानाही पेरणीचा निर्णय घेतला होता, त्यांचा जीव आता टांगणीला लागला आहे. दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी खरीपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात देखील केली आहे. दरम्यान, अनेक भागात चांगला पाऊस झाला नाही, त्या भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. १०० मिमी पााऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असं आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.