मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. पुढील तीन दिवस, गुरुवारपर्यंत असाच पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत गेल्या शुक्रवारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला. पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील काही भागात रविवारी रात्री मुसळधार पाऊस पडला. तसेच सोमवारी पहाटेपासून पाऊस सुरूच होता. शहरात सकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसर, विदर्भात मुसळधार पाऊस कोसळत होता. कोकण आणि घाट भागात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, अशी माहिती भारतीय हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि बंगालच्या उपसागराच्या उत्तर-पश्चिम, पश्चिम-मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. दक्षिण महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीलगत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. परिणामी, पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग, मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, असे मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयंता सरकार यांनी सांगितले. सोमवारी सकाळी साडेआठवाजेपर्यंत गेल्या २४ तासांत सांताक्रूझमध्ये ३४ मिमी आणि कुलाब्यात ५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.