मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतली आहे. आजघडीला सातही तलावांमध्ये ८८.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सातही तलावांमध्ये सध्या १२ लाख ८२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही तलावांमध्ये सध्या ८८.५९ टक्के पाणीसाठा आहे. जूनमध्ये पाऊस न पडल्यामुळे पाणीसाठा ९ टक्क्यापर्यंत खालावला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा तलावात तिप्पट पाणीसाठा आहे. मोडक सागर, तानसा आणि तुळशी हे तलाव पूर्ण भरले आहेत. मात्र आता पावसाने विश्रांती घेतली असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
तीन वर्षांतील २१ जुलैपर्यंतचा पाणीसाठा –
वर्ष – – ( दशलक्ष लिटर मध्ये) …..टक्केवारी
२०२२ – १२,८२,२६६ …… ८८.५९ टक्के
२०२१ – ५,३१,७३४ …. ३६.७४ टक्के
२०२० – ४,०८,८८४….. २८.२५ टक्के